

जोतिबा डोंगर : श्री क्षेत्र जोतिबा मंदिरातील आदिमाया चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा 30 व 31 जुलै रोजी होत असून भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. बुधवारी (दि. 30) मंदिर अहोरात्र दर्शनासाठी खुले राहणार असून गुरुवारी (दि. 31) सकाळी 6 वाजता धुपारती सोहळा होऊन यात्रेची सांगता होईल. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून सुमारे तीन लाख भाविक येतात.
शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार, देवस्थान समितीचे अधीक्षक धैर्यशील तिवले, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम, कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठका झाल्या. देवस्थान समितीकडून वाहनांच्या पार्किंगसाठी, वीजपुरवठा, मंदिरातील दर्शन रांगांसाठी आवश्यक बॅरिकेड, सीसीटीव्ही याची तयारी पूर्ण केली आहे. ग्रामपंचायतकडून स्वच्छता, पाणी शुद्धीकरण, गटारींची स्वच्छता, शौचालये तसेच पिण्याच्या नळ पाणी पुरवठा या कामाची तयारी झाली आहे. आरोग्य अधिकारी आणि त्यांची सर्व टीम सज्जही आहे.