

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दरबारी रविवारी अनुचित प्रकार घडला. सासनकाठीसोबत असणारे भाविक आणि पुजारी यांच्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये भाविकांना पुजार्यांकडून मारहाण झाल्याचे सांगण्यात आले, मात्र प्रत्यक्षात घटनेची माहिती न घेता पुजार्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याने जोतिबा ग्रामस्थांनी सोमवारी कडकडीत बंद पुकारला.
यामध्ये व्यापारी असोसिएशनही सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण शुकशुकाट होता. जोतिबा पुजारी वर्गाकडून घटनेची सत्यता न बघता पुजार्यावरील चुकीचे आरोप आणि बदनामीसंदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला.
रविवारी परिते येथील ग्रामस्थ सासनकाठी घेऊन जोतिबा डोंगरावर आले होते. सकाळपासून वाद्यांवर नाचत मंदिर प्रदक्षिणा मारत होते. मात्र यातील काही हुल्लडबाज भाविक, गर्दीत इतर भाविक, पुजारी, देवस्थान समितीचे कर्मचारी यांना नाहकपणे त्रास देत होते. ‘श्रीं’च्या आरती सोहळ्यात मानकर्यांच्या टोप्या काढणे, धोतर ओढणे, पुजार्यांच्या तोंडावर गुलाल मारणे असे कृत्य करीत राहिले.
सासनकाठीधारकांकडून दिलगिरी
पोलिस, देवस्थान समितीचे कर्मचारी या सासनकाठीसोबत असणार्या लोकांना समजावून सांगत असताना त्यांनी दमदाटी करून अंगावर जाण्याचा प्रकार घडला. पुजार्यांना खोबर्याची वाटी, गुलाल फेकून देखील मारल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी हे कृत्य करणारे आणि पुजारी यांच्यात वाद झाला. यानंतर सासनकाठीधारकांनी दिलगिरी व्यक्त करून या प्रकरणावर पडदा टाकला.