Jotiba Chaitra Yatra 2026 | जोतिबा चैत्र यात्रेत भुयेच्या मानाच्या सासनकाठीचा 'पर्यावरण जागर'

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून विशेष कौतुक
Jotiba Chaitra Yatra 2026
Jotiba Chaitra Yatra 2026
Published on
Updated on

नागाव : पुढारी वृत्तसेवा श्री क्षेत्र वाडी-रत्नागिरी (जोतिबा डोंगर) येथील चैत्र यात्रेमध्ये यंदा भुये (ता. करवीर) येथील मानाची सासनकाठी क्रमांक ४० आकर्षणाचे केंद्र ठरली. केवळ भक्तीच नव्हे, तर 'पर्यावरण रक्षणा'चा मोलाचा संदेश देत या सासनकाठीने यात्रेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मानकऱ्यांचे कौतुक केले.

प्रशासनाच्या आवाहनाला गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, भुये गावच्या मानकऱ्यांनी यंदाची यात्रा पर्यावरणपूरक साजरी करण्याचा निर्धार केला होता. दुपारी सासनकाठीची बारी सुरू झाली तेव्हा भाविकांच्या हातात भक्तीच्या जोडीला जनजागृतीचे फलकही झळकत होते. यामध्ये प्रामुख्याने पुढील आशयाचे संदेश देऊन भाविकांचे लक्ष वेधून घेण्यात आले.

  • "जंगलतोड रोखू, पर्यावरण वाचवू"

  • "प्लास्टिकमुक्त व केमिकलमुक्त चैत्र यात्रा साजरी करू"

  • "लावा झाडे, वाचवा पुढची पिढी"

  • "वनवा पेटवू नका"

कापडी पिशव्यांचे वाटप आणि शिस्तबद्ध सहभाग

केवळ घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीवर भर देत सासनकाठी परिसरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, सर्व भाविकांनी “चांगभलं – मानाची सासनकाठी नंबर ४०” असे लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या परिधान केल्या होत्या, ज्यामुळे या उपक्रमाला एक शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले.

जिल्हाधिकाऱ्यांनीही धरला सासनकाठीचा फेर

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या उपक्रमाची पाहणी करून ग्रामस्थांचे अभिनंदन केले. इतकेच नव्हे तर, त्यांनी स्वतः सासनकाठी नाचवून या उपक्रमाला प्रोत्साहन दिले. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधींनीही या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे छायाचित्रे काढून कौतुक केले.

संकल्पना आणि उपस्थिती

हा उपक्रम सासनकाठीचे मानकरी अमर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी भुये, भुयेवाडी, निगवे, शिये, जठारवाडी या पंचक्रोशीतील हजारो जोतिबा भक्त मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news