

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेला मंगळवार (दि. 31) पासून प्रारंभ होत असून बुधवारी (दि. 1) यात्रेचा मुख्य दिवस आहे. मंदिर परिसरात बांधलेल्या नव्या दर्शन मंडपातून भाविकांसाठी दर्शन रांग करण्यात आली आहे. यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहेत. संपूर्ण यात्राकाळात 120 हून अधिक कॅमेर्याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
बुधवारी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक होणार आहे. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सासनकाठी पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या दर्शन मंडपातील सर्व मजले दर्शन रांगेसाठी वापरण्यात येणार आहेत. दर्शन मंडपामध्ये बॅरिकेडिंग, आवश्यक प्रकाश व्यवस्था, हवा खेळती राहण्याकरता पंखे बसविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली आहे.