

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून टोकाचा राजकीय संघर्ष असणार्या आणि एकमेकांना पाण्यात पाहणारे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व शाहू समूहाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे समरजित घाटगे यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सत्तेसाठी एकत्र येत नाही, तर कागलच्या विकासासाठी समान हेतूने एकत्र येत असल्याचे सांगितले. आम्ही एकत्र येऊ, असे यापूर्वी वाटत होते का? त्यामुळे आता भविष्यात काय होईल, याचा विचार करून एकत्र आलेलो नाही, असे एका प्रश्नाला उत्तर देत जिल्हा परिषद निवडणुका देखील आम्ही एकत्र लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपली भूमिका मांडताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, अशा प्रकारची युती कागल तालुक्यात यापूर्वीही झालेल्या आहेत. परंतु, आपण व घाटगे एकत्र येण्याच्या घटना इतक्या अचानक घडल्या की, त्यामुळे कार्यकर्त्यांची मते देखील जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. टोकाचा संघर्ष असताना आम्ही एकत्र आलो आहे. त्यामुळे संघर्ष सोडून आता हातात हात घालून काम करण्याची भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांनी देखील यापूर्वी झालेल्या गोष्टी मनातून काढून टाकाव्यात आणि जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी एकजुटीने कामाला लागावे.
वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेबाबत घाटगे यांनी निवेदन केले आहे. उमेदवारी मिळाली त्यांचे समाधान झाले; परंतु आघाडी झाल्यामुळे काही लोकांवर अन्याय होणार आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न करू. पाच वर्षांत कार्यकर्त्यांना जपण्याचे काम आपण व घाटगे यांनी केले आहे. भविष्यात ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचा सन्मान करण्याचा व त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचे काम आम्ही दोघे करू. भाजपचे संजय घाटगे हे देखील युतीमध्ये आहेत. परंतु, त्यांच्याशी अद्याप आपली चर्चा झालेली नाही. बुधवारी (दि.19) त्यांच्याशी चर्चा होईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, अखिलेश घाटगे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, सविता माने, तसलिम राजेखान, रणजितसिंह पाटील, अमरसिंह घोरपडे, सुनील मगदूम आदी उपस्थित होते.
आपली भूमिका स्पष्ट करताना समरजित घाटगे म्हणाले, आम्ही एकत्र येण्यासंदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून चर्चा सुरू होत्या, असे बोलले जाते त्यामध्ये काही तथ्य नाही. वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेतून आम्हाला एकत्र यावे लागले. प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. ती वेळ आल्यामुळे आम्ही समान हेतूने एकत्र आलो आहे. इतकी वर्षे आम्ही एकमेकांविरोधात ताकद घालवत राहिलो. आता हीच ताकद विकास कामांसाठी वापरण्यात येईल. यामुळे भविष्यात कागलचा विकास अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांची गैरसोय होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येईल.
वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनुसार फॉर्म्युला ठरला आहे. मुश्रीफ व आपल्यात चांगला समन्वय आहे. त्यामुळे कोणावरही टीका-टिपणी न करता दोन्ही गटांनी यापुढे काम करावयाचे आहे. हा संघर्ष मिटविण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी एक पाऊल पुढे टाकले, मी देखील एक पाऊल पुढे टाकले, यामागे अद़ृश्य शक्तीची ताकद आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत आघाडी केल्यामुळे आपण राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर ही निवडणूक लढविणार नसल्याचेही घाटगे यांनी सांगितले. वरिष्ठ पातळीवरील झालेली चर्चा, अद़ृश्य शक्ती याबाबत विचारले असता, त्यांनी वेळ आल्यावर बोलू ,असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. कागल तालुक्यावर विशेष प्रेम असल्यामुळे मध्यस्थीनेच आम्हाला बोलावून घेतले. त्यामुळे मुंबईला मी अगोदर गेलो की मंत्री मुश्रीफ गेले, हा प्रश्नच नाही, असेही घाटगे यांनी सांगितले.