Jitu Shah Award: कोल्हापूरच्या जितू शाह ‘एक्सलन्स इन अॅग्री कमोडिटीज – डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ पुरस्काराने सन्मानित

कृषी कमोडिटी व्यापाराच्या डिजिटल आधुनिकीकरणातील साडेचार दशकांच्या योगदानाची दखल; जेके इंडिया ईअॅग्रीटेक लिमिटेडच्या कार्याचा गौरव
Jitu Shah
Jitu ShahPudhari
Published on
Updated on

कोल्हापूर: भारताच्या व्यावसायिक क्षेत्रात परिचित असलेले आणि जेके इंडिया ईअॅग्रीटेक लिमिटेडचे संस्थापक जितेंद्रकुमार (जितू) शाह यांना ‘एक्सलन्स इन अॅग्री कमोडिटीज – डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साखर, बायोएनर्जी आणि संबंधित उद्योगांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविणे तसेच कृषी कमोडिटी व्यापाराचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या उद्योगविश्वासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला.

१९८१ मध्ये जितू शाह यांनी कोल्हापूरातून जेके एंटरप्रायझेसची स्थापना करून साखर व्यापारात प्रवेश केला. एका छोट्याशा ट्रेडिंग डेस्कपासून सुरू झालेला हा प्रवास पुढील साडेचार दशकांत जेके ग्रुपमध्ये विकसित झाला. त्यानंतर २०२० मध्ये कुटुंबाचा व्यापार आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म व्यवसायांचे एकत्रीकरण करून जेके इंडिया ईअॅग्रीटेक लिमिटेडची स्थापना करण्यात आली.

आज ही कंपनी व्यापार, मार्केट इन्फॉर्मेशन, संशोधन, कन्सल्टिंग आणि उद्योग परिषदांच्या आयोजनासह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेली तंत्रज्ञान-सक्षम कृषी कमोडिटी कंपनी म्हणून ओळखली जाते.

चिनीमंडी (ChiniMandi), ईबायशुगर (eBuySugar), ॲग्रीमंडी (AgriMandi), बायोएनर्जीटाईम्स (BioEnergyTimes) आणि शुगर इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स (SEIC) यांसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कंपनी साखर उत्पादक, व्यापारी, खरेदीदार आणि संबंधित उद्योगांतील घटकांना डिजिटल ट्रेडिंग इन्फ्रास्ट्रक्चर, मार्केट इंटेलिजन्स, उद्योगविषयक बातम्या आणि विविध उद्योग मंचांद्वारे एकत्र जोडत आहे. या माध्यमातून कोल्हापूरच्या साखर व्यापाराची परंपरा राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल व्यावसायिक व्यासपीठापर्यंत पोहोचली आहे.

पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना जितू शाह म्हणाले, "हा सन्मान संपूर्ण जेके इंडिया ईअॅग्रीटेक परिवाराचा आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भागीदाराचा आहे. गेली ४५ वर्षे आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत आणि आज आम्ही जे काही उभारत आहोत, त्यामागे या दीर्घ अनुभवाचीच ताकद आहे. कृषी परिसंस्था अधिक पारदर्शक, अधिक परस्परसंलग्न आणि अधिक कार्यक्षम बनवणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. हा पुरस्कार साखर आणि संबंधित उद्योगांसाठी आणखी नाविन्यपूर्ण काम करण्याची प्रेरणा देणारा आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news