Kolhapur News: बाप रे! गाईने दिला चक्क तीन सुदृढ वासरांना जन्म; पाहण्यासाठी गोठ्यात गावकऱ्यांची झुंबड

अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे एका जर्सी गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. यामुळे या ठिकाणी ही घटना पाहण्यासाठी अनेक नागरिक भेट देत आहेत.
cow gives birth to three calves
cow gives birth to three calvespudhari photo
Published on
Updated on

Kolhapur News

अब्दुललाट : अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे एका जर्सी गाईने तीन वासरांना जन्म दिला आहे. यामुळे या ठिकाणी ही घटना पाहण्यासाठी अनेक नागरिक भेट देत आहेत.

गाईला जुळे वासरे होण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्या तरी एकाच वेळी तीन वासरांचा जन्म होणे ही अत्यंत दुर्मिळ बाब मानली जाते. मात्र, अब्दुललाट येथील शेतकरी व पशुपालक महावीर पारिसा बरगाले यांच्या गोठ्यातील जर्सी गाईने चक्क तीन सुदृढ वासरांना जन्म देऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे प्रसूतीनंतर गाय आणि तिन्ही वासरे पूर्णपणे निरोगी असून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही अडचण नसल्याने बरगाले कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

cow gives birth to three calves
Nanded News: वीज कोसळल्याने कडब्याची गंजी जळून खाक; मांजरमवाडी शिवारातील घटना

महावीर बरगाले हे शेतीसोबत दुग्ध व्यवसायही करतात. त्यांच्या गोठ्यातील जर्सी गाईची प्रसूती सुरू झाल्यानंतर सुरुवातीला दोन वासरे जन्माला आली. त्यानंतर आणखी एका वासराचा जन्म झाल्याने उपस्थितांची उत्सुकता आणि आनंद द्विगुणित झाला. तिन्ही वासरे चांगल्या प्रकृतीची असून आईचे दूध व्यवस्थित पित आहेत. गायदेखील पूर्णपणे सुदृढ असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

पशुसंवर्धन क्षेत्रातील जाणकारांच्या मते, गाईमध्ये तिहेरी गर्भधारणा होणे आणि तिन्ही वासरांचा सुरक्षित जन्म होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. अशा प्रसंगी प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, योग्य काळजी, वेळेवर केलेले व्यवस्थापन आणि निसर्गाची साथ यामुळे गाय व तिन्ही वासरे सुरक्षित राहिली आहेत.

या अनोख्या घटनेची माहिती परिसरात पसरताच अनेक शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी बरगाले यांच्या गोठ्याला भेट देऊन तिन्ही वासरे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. अनेकांनी ही घटना शुभ मानत बरगाले कुटुंबाचे अभिनंदन केले. सध्या अब्दुललाट परिसरात या दुर्मिळ घटनेची जोरदार चर्चा सुरू असून पशुपालन क्षेत्रातही हा एक कौतुकाचा विषय ठरला आहे.

cow gives birth to three calves
Cow Circling a Field : ७ दिवस शेतात गोल-गोल फिरत होती गाय; ग्रामस्थांना वाटला चमत्कार, पण समोर आले सत्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news