Jaysingpur Stormy rain | जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा : पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली!

जयसिंगपुरात घरात शिरले पाणी, तब्बल दीड ते दोन तास झालेल्या या धुवांधार पावसाने झोडपले
जयसिंगपूर येथे लक्ष्मी रोड परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले
जयसिंगपूर येथे लक्ष्मी रोड परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले
Published on
Updated on

जयसिंगपूर : गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या जयसिंगपूर, शिरोळ, उदगाव, नांदणी, धरणगुत्ती आणि संभाजीपूर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आणि गारांसह मुसळधार पाऊस झाला. तब्बल दीड ते दोन तास झालेल्या या धुवांधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्र्याची शेड उडाली, तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील वीज पुरवठा खंडित केला होता.

जयसिंगपूर शहरातील लक्ष्मी रोडचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, जुन्या मार्गावर जवळपास दीड ते दोन फूट भर टाकल्याने रस्त्याची उंची वाढली आहे. नव्याने केलेल्या रस्त्याखाली लहान आकाराच्या पाईप टाकल्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, पश्चिमेकडील अनेक घरांमध्ये पाऊस आणि नाल्याचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. याशिवाय, शहरात भुयारी गटारींची कामे सुरू असल्याने रस्त्यांवर दलदल निर्माण झाली असून दुचाकी घसरण्याचे प्रकार घडले.

मुसळधार पावसामुळे जयसिंगपूर शहरातील नांदणी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. जयसिंगपूर कॉलेजच्या गेटसमोर तब्बल दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, खोळंबलेल्या शेती मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news