

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील प्रस्तावित एमआयडीसी रद्द करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ, माजी सैनिक व महिलांनी मेंढ्यांसह मंगळवारी दुपारी शिरोळ तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांनी शिरोळ प्रशासकीय कार्यालयाचे लोखंडी गेट तोडले, तसेच प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या.
यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याने शिरोळ तहसील कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता; तर मेंढ्या आत नेण्यावरून पोलिस व आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. आंदोलकांनी प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान गेट अंगावर पडल्याने एक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरातच ठिय्या आंदोलन सुरू केले.