

जयसिंगपूर : कायद्याचे रक्षण करणार्या पोलिस ठाण्याच्या उंबरठ्यावरच दोन गट आपापसांत भिडल्याची धक्कादायक घटना जयसिंगपूर येथे घडली. उदगाव (ता. शिरोळ) येथील वाद मिटवण्यासाठी आलेल्या दोन गटांत शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास पोलिस ठाण्यासमोरच फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामध्ये महिलांचाही सहभाग असून याप्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
यावेळी पोलिस कॉन्स्टेबल फारूक जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राजेंद्र बंडू पाटील (42), माहेश्वरी राजेंद्र पाटील (35), युवराज राजेंद्र पाटील (20) , गंधराज राजेंद्र पाटील (19) , मंगल बंडू पाटील (40), श्रीवर्धन शिरीष वरेकर (26), शरद पांडुरंग लुगडे (42), शिरीष तुकाराम वरेकर (60), हेमलता वरेकर (सर्व रा. माळवाडी, उदगाव) यांचा समावेश आहे.
नेमकी घटना काय?
उदगाव येथील माळवाडी परिसरातील दोन गटांमध्ये जुना वाद आहे. यावरून तक्रार देण्यासाठी माहेश्वरी पाटील आणि श्रीवर्धन वरेकर हे आपापल्या समर्थकांसह जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी दोन्ही गटांनी पोलिसांना सांगितले की, आमचा गावातील वाद आहे, आम्ही गावात बैठक घेऊन तो मिटवतो. यानंतर हे दोन्ही गट पोलिस ठाण्याबाहेर पडले. मात्र पोलिस ठाण्याच्या गेटबाहेर पडताच दोन्ही गटांतील संयम सुटला आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. वादाचे पर्यवसान काही क्षणातच तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील पुरुष व महिला एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करू लागले. इतकेच नव्हे तर एकमेकांना उचलून आपटण्याचे प्रकारही घडले. हा थरार पाहून पोलिस ठाण्यासमोर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. चक्क पोलिस ठाण्यासमोरच राडा सुरू असल्याचे समजताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांना प्रथम एकमेकापासून बाजूला केले. त्यानंतर संबंधितांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यासमोरच अशा प्रकारे कायदा हातात घेतल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.