

Nandani Shirol 8 year old girl abduction
जयसिंगपूर : नांदणी (ता.शिरोळ) येथे स्वरा शितल देसाई या आठ वर्षांच्या बालिकेच्या अपहरणाचा शुक्रवारी रात्री प्रयत्न झाला. या बालिकेने अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेऊन आरडाओरड केल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञातांनी हा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री उशिरा शिरोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले नाहीत. या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, स्वरा लहान भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात होती. यावेळी तीन-चार जण अंधाराचा फायदा घेत तोंड दाबून उचलून घेण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या प्रकाराने लहान भाऊदेखील घाबरला. प्रसंगावधान राखून स्वराने अपहरणकर्त्यांच्या हाताचा चावा घेऊन मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. तिचा आरडाओरडा ऐकून काही जण घराबाहेरही आले.
यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते शिरोळ मार्गावरून पोबारा केला. पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. शिरोळ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. पण अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने अपहरणकर्त्यांची माहिती मिळू शकली नाही.