

कोल्हापूर : लिलावामधील सोन्यांसह अलिशान मोटारी बाजारभावापेक्षा कमी किमतीत देण्याच्या बहाण्याने जयसिंगपूर येथील एकाला 43 लाख 74 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी कोल्हापूर येथील महिलेविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. स्नेहा सज्जन नारकर (वय 35) असे महिलेचे नाव आहे. संशयित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयित महिलेला सायंकाळपर्यंत ताब्यात घेतले नव्हते, असे सांगण्यात आले. नितीन दिलीप जंगम (वय 40, चौथी गल्ली, सिद्धेश्वर मंदिराजवळ, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मे- जून 2024 मध्ये इचलकरंजी येथील मित्राच्या संपर्कातून महिलेची ओळख झाली. जून ते डिसेंबर 2024 या काळात संशयित महिलेने व्यावसायासाठी कर्ज मिळवून देतो,अलिशान मोटारबाजार भावापेक्षा कमी दरात घेऊन देतो, याशिवाय लिलावातील सोनेही बाजारभावापेक्षा कमी किमतीत देतो, असे भासवून विश्वास संपादन केला.
फिर्यादी जंगम यांच्याकडून संबंधित महिलेने ऑनलाईन 38 लाख 24 हजार व रोख 5 लाख 50 हजार रुपये असे एकूण 43 लाख 74 हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयित महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर तपास करीत आहेत.