

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रपट निर्मितीचा मानबिंदू असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या जागा हस्तांतरणाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. स्टुडिओच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत राज्य शासनाच्या वतीने दोन वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाला अध्यादेश पाठवला होता. मात्र, त्यामध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणीच महापालिका प्रशासनाने अद्याप केली नसल्याची बाब समोर आली आहे.
3 ऑगस्ट 2023 रोजी राज्य शासनाचे तत्कालीन कक्ष अधिकारी अर्जुन लांडगे यांनी महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त कादंबरी बलकवडे यांना जयप्रभा स्टुडिओ जागा हस्तांतरण करण्याचा अध्यादेश पाठवला होता. स्टुडिओच्या जागेच्या मोबदल्यात महालक्ष्मी स्टुडिओ एल एल पी फर्म यांना पर्यायी जागा परस्पर सहमतीने उपलब्ध करून देऊन स्टुडिओची जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे नमूद केले आहे. तसेच आवश्यक ती कार्यवाही करून फेरबदलाचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशीही सूचना करण्यात आली आहे. या अध्यादेशानुसार महापालिका प्रशासनाच्या वतीने कार्यवाही न केल्याने जयप्रभा स्टुडिओच्या जागा हस्तांतरणाचा प्रश्न दोन वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे.