

सुभाष पाटील
विशाळगड : जागतिक महिला दिन आपण सर्वत्र साजरा करतो, पण खऱ्या अर्थाने 'स्त्री शक्ती' आणि 'मातृत्व' काय असते, याचे जिवंत उदाहरण शाहुवाडी तालुक्यातील चनवाड येथे पाहायला मिळते. कोणत्याही शासकीय अनुदानाची अपेक्षा न ठेवता, केवळ समाज दातृत्वाच्या जोरावर आतापर्यंत ७०० हून अधिक अनाथ आणि वंचित मुला-मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पसरवणाऱ्या जयश्री दिपक बुचडे या माऊलीची ही प्रेरणादायी गाथा. त्यांना अनेक सेवाभावी संस्थाकडून गौरविण्यात आले असून महिला दिनी त्यांना नुकताच राज्यस्तरीय अनाथांची माय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वडिलांचा वारसा आणि १९ वर्षांची अखंड सेवा
मूळच्या वडणगे (ता. करवीर) येथील असलेल्या या माऊलींचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. मात्र, त्यांचे कार्य कोणत्याही पदवीपेक्षा मोठे आहे. २००६ साली त्यांच्या वडिलांनी अनाथ मुलांच्या सेवेचे जे छोटेसे रोपटे लावले होते, त्याचे आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेली १९ वर्षे त्या अखंडपणे या मुलांचा सांभाळ करत आहेत.
स्वतःच्या हाताने बनवतात लेकरांचे जेवण
या कार्यात त्यांना त्यांचे पती दीपक बुचडे आणि मुलगा जयदीप बुचडे, मुलगी सानिया यांची मोलाची साथ लाभत आहे. 'देवघर सेवाधाम'मध्ये राहणाऱ्या मुलांपैकी कोणाला आई नाही, कोणाला वडील नाहीत, तर काही पूर्णपणे अनाथ आहेत. या मुलांचे जेवण, निवास आणि शिक्षण यांची जबाबदारी या माऊलीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. विशेष म्हणजे, मुलांसाठी स्वतः जेवण बनवण्यापासून ते त्यांच्या संस्कारांपर्यंत सर्व काही त्या स्वतः पाहतात.
अनुदानाविना माणुसकीचा प्रवास
शासकीय अनुदानाचा कोणताही आधार नसताना, समाजातील दानशूर व्यक्तींकडे पदर पसरून त्या या लेकरांचा उदरनिर्वाह करत आहेत. "ही मुले माझीच आहेत," ही भावनाच त्यांना दररोज काम करण्याची शक्ती देते. आज ७०० पेक्षा जास्त मुलांच्या चेहऱ्यावर जे हसू उमलत आहे, त्याचे सर्व श्रेय या माऊलीच्या जिद्दीला जाते.
"शिक्षण कमी असले तरी संस्कारांची शिदोरी मोठी आहे. परिस्थितीने अनाथ झालेल्या या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे."
— जयश्री बुचडे, देवघर सेवाधाम संस्थापिका