

इंद्रजीत शिंदे
पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जनसुराज्य शक्ती पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले. नगराध्यक्षपदासह सदस्यपदाच्या 16 जागा जिंकून गडावर पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार जयश्री प्रकाश पोवार (तोरसे) यांनी नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत 1,762 मते मिळवून मोठा विजय संपादन केला. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार सुधा सुहास भगवान यांचा 1,072 मतांच्या फरकाने पराभव केला. सुधा भगवान यांना 690 मते मिळाली, तर 60 मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला.
नगराध्यक्ष पदासह सदस्यपदाच्या निवडणुकीतही जनसुराज्यने आपली पकड मजबूत ठेवली आहे. या निकालात शिव-शाहू विकास आघाडीच्या प्रियांका मारुती गवळी आणि सतीश कमलाकर भोसले यांनीही आधीच बिनविरोध विजय मिळवला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी माधवी जाधव-शिंदे यांनी निकाल जाहीर केल्यानंतर पन्हाळा गडावर जनसुराज्यचा गुलाल उधळला गेला असून, नव्या कारभार्यांच्या स्वागतासाठी शहर सज्ज झाले आहे.
जनसंपर्काच्या जोरावर अपक्षांची बाजी
प्रस्थापित पक्षांचे सर्व दिग्गज नेते आणि संपूर्ण यंत्रणा एका बाजूला असतानाही, अपक्ष उमेदवारांनी मिळवलेला विजय सध्या गडावर मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा मोठी पक्षीय ताकद पाठीशी नसताना केवळ जनसंपर्काच्या जोरावर अपक्षांनी प्रस्थापितांच्या गडाला खिंडार पाडले आहे. विशेषतः जनसुराज्य, भाजप आणि शाहू महाआघाडी अशा दिग्गज आघाड्यांसमोर अपक्षांनी दिलेली ही झुंज लोकशाहीतील मतदारांच्या स्वतंत्र कौलाची साक्ष देणारी ठरली. असे आहे बलाबल...
पन्हाळा नगरपरिषदेच्या एकूण 20 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 14 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासह एकूण 16 जागांवर जनसुराज्य, भाजप आणि शाहू आघाडीच्या युतीने ताबा मिळवला असून, यामध्ये 6 बिनविरोध जागांचाही समावेश आहे. या विजयात जनसुराज्यने 8, भाजप 2 आणि शाहू आघाडीने 2 जागांवर विजय संपादन केला, तर 6 जागा यापूर्वीच बिनविरोध (जनसुराज्य 3, शिवशाहू 2, शाहू आघाडी 1) झाल्या होत्या.
धडेल यांचा निसटत्या मतांनी पराभव
प्रभाग 1 ब मध्ये माजी नगराध्यक्षा रूपाली धडेल यांचे पती आणि जनसुराज्य पक्षाचे प्रबळ उमेदवार रवींद्र धडेल यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अपक्ष उमेदवार महेश भाडेकर यांनी धडेल यांचा अवघ्या 6 मतांच्या निसटत्या मतांनी पराभव केला. या निकालामुळे जनसुराज्यच्या बालेकिल्ल्यात एका दिग्गज नेत्याला पराभूत करून अपक्षाने मिळवलेल्या विजयाची सध्या पन्हाळगडावर मोठी चर्चा होत आहे. हा निकाल जनसुराज्य पक्षासाठी एका जागेचा असला, तरी राजकीयद़ृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.