

कोल्हापूर : जिल्ह्यातील गूळ व्यवसायाला यंदाच्या हंगामात काहीशी उभारी मिळाल्याचे चित्र आहे. नियमितपणे सुरू राहिलेली गुर्हाळ घरे, बाजारात मिळालेला समाधानकारक दर यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोल्हापूर बाजार समितीमध्ये 2.21 लाख गूळ रव्यांची आवक जादा झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत गतवर्षी 16,18,323 तर यंदा 19,04,988 इतक्या गूळ रव्यांची आवक झाली आहे, तर सरासरी दर गतवर्षी 4 हजार होता. यंदा यात काहीशी वाढ होऊन सरासरी दर 4,100 रुपये राहिला आहे.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये करवीर, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा आणि कागल तालुक्यांतून गूळ रव्यांची आवक होते. मागील काही वर्षांत गूळ उत्पदानाचा वाढलेला खर्च, अकुशल व कामगारांची अपुरी संख्या यामुळे कोल्हापूरच्या गूळ उद्योगाला घरघर लागली होती. गुर्हाळ घर तोट्याचे ठरू लागल्याने जिल्ह्यातील गुर्हाळ घरे मोठ्या संख्येने बंद झाली. जिल्ह्यात असणारी 1,200 गुर्हाळ घरांची संख्या सध्या शंभरवर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गूळ उत्पादन घटत गेले. मात्र, यंदाच्या हंगामात गूळ रव्यांची आवक वाढल्याचे समाधानकारक चित्र आहे.
हंगामात दर समाधानकारक
हंगामात गुळाचा दर समाधानकारक राहिला आहे. आतापर्यंत प्रतिक्विंटल कमी 3,600 तर जास्त 5,600 रुपये इतका दर गुळाला मिळाला आहे. सरासरी दर 4,100 रुपये राहिला आहे.
परराज्य, देशात निर्यात
कोल्हापूर बाजार समितीमध्ये येणारा गूळ हा संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह आखाती देशात पाठविला जातो.
हंगामात 234 कोटींची उलाढाल
गूळ हंगाम सुरू झाल्यानंतर दररोज सकाळी बाजार समितीमध्ये गुळांचे सौदे निघतात. यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. जानेवारी अखेरपर्यंत गुळाच्या खरेदी विक्रीतून 234.31 कोटी रुपये इतकी उलाढाल झाली आहे. सन 2024-25 च्या हंगामात 241.25 कोटींची उलाढाल झाली होती.