

कोल्हापूर : इटालियन फॅशन ब्रँड प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरचा दौरा केला. संवाद झाला, कोल्हापूरचे नाव प्राडा ब्रँडसोबत जोडले गेले, चर्चा झाली, प्राडा तांत्रिक टीम परत गेली, महिनाभराने व्यावसायिक टीम येईल, पण पुढे काय? प्राडाभेटीमुळे कोल्हापुरी चप्पल बनवणार्या कारागीर उत्पादकांना काय मिळणार याचे विचारचक्र सुरू झाले.
भविष्यात प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल उत्पादक यांच्यात व्यावसायिक करार होण्यासाठी आश्वासक मार्ग तयार झाला आहे. प्राडा कंपनीसाठी चप्पलनिर्मितीचे अधिकार पारंपरिक कारागिरांनाच मिळावेत यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ या संस्थेने आग्रही भूमिका मांडली आहे. परिणामी, प्राडा कंपनीची कोल्हापूरवारी कोल्हापुरी चप्पलच्या उत्पादनसाठी उभारी देणारी ठरण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या भेटीत प्राडा कंपनीच्या चार तंत्रज्ञांनी कोल्हापुरी चप्पल बनवणार्या पारंपरिक कारागिरांपासून ते उत्पादक व विक्रेत्यांपर्यंत थेट संवाद साधत कोल्हापुरी चप्पल बनवण्याची प्रक्रिया, त्यातील हस्तकौशल्य, विक्री यंत्रणा, बाजारपेठेतील मागणी व अडचणी याचा सखोल आढावा घेतला. प्राडासारख्या उच्चभ्रू ब्रँडने कोल्हापुरी चप्पल बनवणार्या छोट्या व मध्यम उत्पादकांशी संवाद साधल्यामुळे स्थानिक कारागिरांना एक वेगळ्या प्रकारची आंतरराष्ट्रीय द़ृष्टी प्राप्त झाली. आता गरज आहे ती प्राडाने कोल्हापूरच्या कारागिरांकडून प्रत्यक्ष चप्पल उत्पादन बनवून घेण्याचा हात पुढे करण्याची. हा हस्तमिलाफ घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र चेंबर, फूटवेअर असोसिएशन, औद्योगिक समूह यांनीही मोट बांधली आहे.
प्राडाच्या या भेटीमुळे फक्त एक फॅशन ब्रँड येऊन गेला असे न मानता, हे एक मोठे आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचे संकेत मानले पाहिजे. कोल्हापुरी चप्पलसारखा पारंपरिक वारसा जागतिक व्यासपीठावर नेण्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी ठरू शकते. यासाठी स्थानिक पातळीवर शासन, सहकारी संस्था आणि उद्योजकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.
ब्रँड कोलॅबोरेशन : कोल्हापुरी चप्पलच्या डिझाईन्सवर आधारित प्राडा खास कलेक्शन सादर करू शकते. यासाठी कोल्हापुरी कारागिरांना थेट डिझायनिंग व उत्पादनात सहभागी करून घेण्याची शक्यता आहे.
नवीन बाजारपेठेचा विस्तार : कोल्हापुरी चप्पलची विक्री केवळ स्थानिक बाजारापुरती मर्यादित न राहता युरोप, अमेरिका, जपान अशा देशांतल्या लक्झरी स्टोअर्समध्ये होऊ शकते.
गुणवत्ता सुधारणा व ब्रँडिंग : प्राडाकडून उत्पादन दर्जा, फिनिशिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडिंगबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या एक महिन्यात 30 टक्के कोल्हापुरी चप्पलची जगभरात विक्री झाली. जी चप्पल सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत सीमित होती. ती लक्झरी ब्रँड वापरणार्या सेलिबि—टींपर्यंत पोहोचली. फॅशन जगतातील स्टाईल स्टेटमेंट बनली.