

कोल्हापूर : कोणताही पुतळा बनवणे ही एक मोठी प्रक्रिया असते. त्यात वेगवेगळे चार टप्पे असतात. सर्वसाधारण 25 ते 30 फुटांपर्यंत उंचीचा पुतळा बनवायला दीड ते दोन वर्षे लागतात; पण अलीकडील काळात शिल्पकार पारंपरिक पद्धतीकडे दुर्लक्ष करून थ्रीडी प्रिंटर पद्धतीचा अवलंब करून काही पुतळे बनवतात. त्यामुळे पुतळ्याचा दर्जा आणि टिकाऊपणा घटतो, असे शिये (ता. करवीर) येथील प्रसिद्ध शिल्पकार संताजी चौगले यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेबाबत पुतळा बनवण्याच्या पद्धतीविषयी माहिती घेतली असता यात अनेक बारकावे आढळून आले असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही पुतळा बनविणे ही एक मोठी प्रक्रिया असते. त्यासाठी लॉस्ट व्हॅक्स प्रोसेस या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. ही पद्धत सिंधू संस्कृतीपासून अवलंबली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्या काळातील शिल्पे अजूनही आपणास पाहावयास मिळतात. त्यांचा दर्जाही उत्कृष्ट आहे. या प्रोसेसला खूप वेळ जातो व खर्चही जास्त येतो, असे चौगुले म्हणाले.
पुतळ्याचे सुरुवातीला मातीचे (क्लेवर्क) मॉडेल केले जाते. त्याचे पासिंग झाल्यानंतर त्यावर प्लॅस्टर मोल्ड (वेस्ट मोल्ड) टाकला जातो. त्यातून फायबर ग्लासची कॉपी काढली जाते. फायबर कॉपीवर पीस मोल्डिंग केले जाते. पीस मोल्डिंगमधून व्हॅक्स (मेण) कॉपी काढली जाते. त्यानंतर पुढील कास्टिंग प्रोसेस चालू होते. पुतळ्यातील व्हॅक्स पूर्णपणे बाहेर आल्यानंतर ओतकाम केले जाते. कास्टिंग झालेले पार्ट फिनिश करून एकमेकास जोडले जातात. या पद्धतीमध्ये एक पार्ट कास्टिंग करण्यासाठी 15 ते 20 दिवस कालावधी जातो, असा क्रम त्यांनी सांगितला. सर्वसाधारणपणे 20 ते 25 फुटांपर्यंतच्या पुतळ्याला एक ते दीड वर्षाचा कालावधी लागतो; परंतु अलीकडील काळात आयोजकांना गडबड असते. त्यामुळे यातील लॉस्ट व्हॅक्ससारख्या प्रक्रिया वगळल्या जातात. त्याऐवजी प्रेस कास्टिंगसारखे शॉर्टकट वापरून पुतळा बनवला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पुतळ्याच्या मजबुतीसाठी बाह्य रूपाइतकेच आतील स्ट्रक्चरही महत्त्वाचे ठरते. पुतळा तयार करताना आधी निर्धारित मापाचे आय बीम बनवले जातात. खांद्यापर्यंत दोन उभे बीम वापरले जातात. त्याला झिगझॅग पद्धतीने वेल्डिंग करून इतर बीम जोडले जातात. शिवाय पुतळ्याच्या आकाराप्रमाणे त्याला खाली आणि खांद्यापर्यंत जॉईंटच्या जागी आडवे सपोर्ट बीम वापरले जातात. यासाठी उच्च प्रतीचे स्टील वापरले जाते. मेटलच्या बॉडीला बीम जोडताना नट-बोल्टवर ब्राँझचे ब्रीजिंग केले जाते. त्यामुळे त्याला गंज लागत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
पुतळा ब्राँझ धातूचा असतो. ब्राँझ म्हणजे कांस्य धातू. यात 85 टक्के कॉपर (तांबे) हा मुख्य घटक असतो. याशिवाय यात लीड (शिसे), झिंक (जस्त), टीन (कथिल) अशा धातूंचे मिश्रण असते. ब्राँझ हे टिकाऊ, गंजविरहित असल्यामुळे पुतळे बनवण्यासाठी याचा वापर प्राधान्याने केला जातो. अलीकडील काळात ब्राँझऐवजी पितळेचा पुतळा करून त्याला ब्राँझसारखा रंग देऊन कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्याचे प्रकारही काही शिल्पकार करीत असल्याचे संताजी चौगले यांनी सांगितले.