कोल्हापूर : जिल्ह्यातील १ हजार १३६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. येत्या दहा दिवसांत या दाखल्यांची पडताळणी पूर्ण करून पात्र अर्जदारांना प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी समाजकल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिला. पूर्वकल्पना देऊनही जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त भारत केंद्रे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी मागणीचे निवेदन त्यांच्या खुर्चीला चिकटवून निषेध व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंत मुळीक, रूपेश पाटील, शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ समाजकल्याण कार्यालयात केंद्रे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, केंद्रे कार्यालयात उपस्थित नसल्याने समितीचे सदस्य तथा संशोधन अधिकारी संभाजी पोवार निवेदन स्वीकारण्यासाठी आले. यावेळी रूपेश पाटील यांनी कुणबी दाखल्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याबाबत त्यांना जाब विचारला. तसेच प्रलंबित प्रस्तावांची यादी देण्याची मागणी केली. त्यावर पोवार यांनी कार्यालय प्रमुखांकडून यादी घ्यावी, असे उत्तर दिले.
यावेळी मुळीक म्हणाले, जिल्ह्यात दीड लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. मात्र, या नोंदींच्या आधारे दाखले मिळविताना आणि पडताळणीच्या वेळी अधिकाऱ्यांकडून अर्जदारांना त्रास दिला जात आहे. किरकोळ त्रुटी काढून मराठा समाजातील १ हजार १३६ दाखल्यांचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. याबाबत जाब विचारण्यासाठी पूर्वकल्पना देऊन भारत केंद्रे यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. मात्र, ते कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांचा मोबाईलही बंद होता.दहा दिवसांत प्रलंबित दाखल्यांची पडताळणी पूर्ण न केल्यास कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी अभिजित कांजर, सरदार पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, महेश जाधव, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.
पैशांसाठी त्रुटी काढल्या जात असल्याचा आरोप
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी कुणबी दाखल्यांच्या पडताळणी प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, पडताळणी समितीकडून जाणीवपूर्वक पैशांसाठी अर्जदारांची अडवणूक केली जाते. दलालांमार्फत प्रस्ताव दाखल केल्यास कोणत्याही त्रुटी काढल्या जात नाहीत. याउलट मध्यस्थांशिवाय अर्ज करणाऱ्यांच्या प्रस्तावांची पडताळणी वेळेत होत नाही.
नातेसंबंध स्पष्ट करणारी कायदेशीर कागदपत्रे नसल्याने कुणबी दाखल्यांचे काही प्रस्ताव पडताळणीविना प्रलंबित आहेत. गेल्या तीन वर्षांत दाखल झालेल्या एकूण प्रस्तावांपैकी १ हजार १३६ प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्याने ते अपात्र ठरले आहेत. संबंधितांनी त्रुटींची पूर्तता केल्यास त्यांचे प्रस्ताव पात्र ठरू शकतात. -
संभाजी पोवार, सदस्य, संशोधन अधिकारी, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर