

कोल्हापूर : आखाती देशांत भडकलेल्या युद्धामुळे तेथील विमानसेवा विस्कळीत झाली असून, याचा मोठा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पर्यटकांना बसला आहे. दुबई आणि इतर देशांत अडकलेले काही पर्यटक मायदेशी परतू लागले असले, तरी अजूनही अनेक जण तिकिटांच्या उपलब्धतेअभावी तिथेच अडकून पडले आहेत. तिथे थांबलेल्या काही पर्यटकांना महाराष्ट्र मंडळाकडून सुविधा उपलब्ध होत आहेत.
सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील ‘गोमटेश टूर्स’ माध्यमातून गेलेले 31 प्रवासी सध्या दुबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. ते सोमवारी (दि. 2) परतणार होते. इंडिगो आणि एअर इंडियाची विमाने पूर्णपणे बंद असल्याने मायदेशी परतण्याचे त्यांचे मार्ग खुंटले आहेत. कोल्हापुरातील अ हेवन हॉलिडेजमार्फत दुबई अबुधाबी सहलीसाठी गेलेले 44 प्रवासी मंगळवारी मुंबईत परतले. या ग््रुापमधील पर्यटक शंकर वाळवेकर यांनी सांगितले की, ‘आम्ही 6 मार्चची तिकिटे काढली आहेत; पण तोपर्यंतचा अतिरिक्त खर्च आम्हाला सोसाव लागत आहे. मुक्काम चार दिवसांनी वाढल्याने आर्थिक ओझे वाढले आहे.’ दरम्यान, या ग््रुापमधील 2 महिलांना सरकारच्या मदतीने बंगळूर मार्गे भारतात आणण्यात यश आले आहे. प्राथमिक माहितीनुसार अजूनही हजारो भारतीय आखाती देशांत अडकून पडले आहेत.