

कोल्हापूर : पावसातील तूट, पावसाचा खंड, पेरणी क्षेत्रातील घट, वनस्पती निर्देशांक, जमिनीतील आर्द्रता, जल निर्देशांक आणि प्रत्यक्ष पीक नुकसानीसह विविध निकषांचा विचार करून दुष्काळ जाहीर केला जात आहे. ट्रिगर १ जिल्ह्यातील सहा तालुक्यांना लागू केला. या निर्णयानंतर जिल्ह्यात ‘सहा तालुक्यांना दिलासा; बाकींचे काय?’ हा प्रश्न समोर आला असून आमच्या तालुक्यात दुष्काळ नाही का? असा सवाल या तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाचा खंड, पिकांची झालेली हानी आणि जमिनीतील घटलेला ओलावा यांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचे फेरमूल्यांकन करा आणि आमच्या तालुक्यातही दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
करवीर तालुक्यात शेतकऱ्यांत तीव्र नाराजी
शिरोली दुमाला : कोल्हापूर शहराला लागून असलेला आणि पाणीदार तालुका म्हणून ओळख असलेल्या करवीरच्या डोंगराळ, पठारी आणि जिरायत भागातील शेतकऱ्यांवर यंदा पावसाच्या अनियमिततेचे संकट ओढवले आहे. बागायती पट्टा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. त्यातच दुष्काळी तालुक्याच्या यादीत करवीरचा समावेश नसल्याच्या वृत्तामुळे जिरायत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ‘सधन तालुका’ अशी सरसकट प्रतिमा तयार करून करवीरमधील शेतकऱ्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
गडहिंग्लजला वाली कोण?
गडहिंग्लज : राज्य शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र गडहिंग्लज तालुक्याचा या यादीत समावेश करण्यात आलेला नसल्याने शेतकरी व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पर्जन्यमानाने समृद्ध असलेल्या गडहिंग्लजच्या शेजारी असलेल्या आजरा व चंदगडचा समावेश यामध्ये झाला असला तरी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करणार्या गडहिंग्लजला सलग दुसर्यांदा वगळल्याने गडहिंग्लजला वाली कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी सातत्याने आंदोलने हाच पर्याय गडहिंग्लजकरांच्या माथी आहे का, अशी विचारणा आता शेतकर्यांतून होत आहे.
हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
इचलकरंजी : राज्य सरकारच्या वतीने नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये हातकणंगले व शिरोळ तालुक्याला वगळण्यात आले. ही यादी जाहीर होताच दोन्ही तालुक्यांतील शेतकर्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तसेच सरकारच्या वतीने कशा पद्धतीने सर्व्हे झाला, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. याबाबत तालुका कृषी विभागाने काय सर्व्हे करून अहवाल दिला याचीही चाचपणी होणे गरजेचे आहे. सध्या दोन्ही तालुक्यातील पिके पावसाअभावी वाळत आहेत. शेतकरी पावसाची वाट पाहात आहे अन् सरकार दुष्काळ नाही, म्हणत असल्याने सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांतून उमटत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या ‘ट्रिगर-१’ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत हातकणंगलेचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी आमदार डॉ. अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शाहूवाडीत तीव्र संताप
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली आहेत. पाऊस नसल्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीन आणि रताळी यांसारखी मुख्य पिके शेतातच करपून गेली असून, पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यातच राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून शाहूवाडी तालुक्यास वगळल्याने तीव्र नाराजी निर्माण झाली आहे....
कागल तालुक्यात हंगाम धोक्यात, यादीत समावेशाची मागणी
कागल : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केलेल्या तालुक्यात कागल तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कागल तालुक्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. भात पीक पोटरीवर आले असताना पावसाची गरज आहे. मात्र पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूूर झाला आहे. दरम्यान, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, ऊस, भात, सोयाबीन,भुईमूग या सर्व पिकांना सध्या पावसाची नितांत गरज असताना पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशावेळी शासनाने कागल तालुका देखील दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची गरज आहे .