

कोल्हापूर : एखाद्या लोकप्रतिनिधीचा अशा पध्दतीने व्हिडीओ व्हायरल होणे चुकीचे आहे. व्हिडीओमधून भ्रष्टाचार होत असल्याचे सिध्द होते. सध्या असा व्हिडीओ व्हायरल झाला, तर एआयचे नाव पुढे केले जाते. मात्र, हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे व्हिडीओ खरा की खोटा यावर संबंधित आमदारांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत संबंधित आमदारांनी उत्तर देणे गरजेचे आहे. व्हिडीओ खोटा असेल, तर त्यांनी ज्यांनी व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, असेही आ. पाटील यांनी काँग्रेस कमिटीत झालेल्या पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, या संभाषणात गोदरेज कंपनीचे नाव समोर येत आहे. त्यामुळे शहरातील कोणत्या कामाचा ठेका या कंपनीला दिला, हे आम्ही सत्तेत नसल्यामुळे माहीत नाही. सध्या असा व्हिडीओ व्हायरल झाला, तर एआयचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे व्हिडीओ खरा की खोटा यावर संबंधित आमदारांनी खुलासा करणे आवश्यक आहे. व्हिडीओमध्ये तथ्य असल्यास या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असेही आ. पाटील यावेळी म्हणाले.