

कोल्हापूर : राजारामपुरी चौथी गल्ली येथे इन्व्हर्टरचा स्फोट होऊन घराला आग लागली. आगीत चेतन व योगश शहा यांच्या प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तीन गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने अनर्थ टळला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
अग्निशमन विभागाचे कावळा नाका, प्रतिभानगर आणि टिंबर मार्केट स्टेशनचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. दीड तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले.
राजारामपुरी चौथी गल्लीत चेतन व योगश शहा कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रविवारी सायंकाळी घरामधील इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट होऊन बॅटरीचा स्फोट झाला. यामुळे घराला आग लागली. क्षणाधार्थ आगीने रौद्ररुप धारण केले. अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत योगेश यांच्यासह येथील सुरज फाले, अश्विन भोसले यांनी धाडसाने घरामधील लोकांसह तीन गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, नगरसेवक रोहित कवाळे, केदार पाटील, करण जाधव, माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनचे जवान नवनाथ साबळे, अभय कोळी, नितेश शिंगारे, संदीप व्हनाळकर, महेश पाटील, योगेश कदम, देवानंद कांबळे, अनिकेत परब, अक्षय पाटील यांनी परिश्रम घेतले.