

कोल्हापूर : टीईटी पेपर घोटाळ्यातील आंतरराज्य टोळीचा सूत्रधार रितेशकुमार, महंमद सलीलसह टोळीतील फरार संशयितांच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने पाटणा येथे संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. संशयितांच्या शोधासाठी बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले. मात्र कोल्हापूरचे पथक पोहोचण्यापूर्वीच टोळीतील साथीदारांनी पलायन केल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिस चौकशीत उपलब्ध झालेले संशयितांचे पाटणा येथील वास्तव्याचे पत्ते, आधार कार्ड, ओळखपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. सूत्रधार रितेशकुमार, महंमद सलीलसह टोळीतील सहाही सराईतांनी दि. 23 नोव्हेंबरपूर्वीच पाटण्यातून अन्यत्र पलायन केल्याची माहितीही पुढे आली आहे. पाटणा येथील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला तपासात सर्व सहाय्य करण्याचे निर्देश तेथील प्रभारी अधिकार्यांना दिले आहेत, असेही सांगण्यात आले.
टीईटी परीक्षा पेपर घोटाळाप्रकरणी मुरगूड पोलिसांनी सातारा येथील मुख्य संशयित गायकवाड बंधूसह 29 जणांना अटक केली आहे. पेपर घोटाळ्यातील आंतरराज्य टोळीतील साथीदारांच्या शोधासाठी सहायक पोलिस निरीक्षक संतोष गळवेसह पथक मंगळवारी सायंकाळी पाटण्यात दाखल झाले आहे. पथकातील अधिकार्यांनी पाटणा येथील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांची भेट घेऊन चर्चा केली.
पाटण्यातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन दिवस शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. पाटण्याजवळील एका वसतिगृहात रेक्टर म्हणून नोकरी करणारा रितेशकुमार टोळीचा सूत्रधार आहे. तर महंमद सलिल याच्यावर टोळीच्या आर्थिक उलाढालीची जबाबदारी आहे. अन्य पाच ते सहा साथीदारांवर पेपर पोहोच करण्याची जबाबदारी असल्याचेही सांगण्यात आले.
तिघांना दोन दिवस पोलिस कोठडी
मुरगूड : टीईटी पेपर फुटीप्रकरणी बुधवारी अटक केलेल्या तिघांना गुरुवारी कागल येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. आकाश बाबासो कदम (वय 26, रा. गुडे, ता. पन्हाळा), दीपक चंद्रकांत कांबळे (30, रा. करवडी, ता. कराड, जि. सातारा) व इंद्रजित प्रवीण पुस्तके (31, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. आणखी पाचजण रडारवर असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.
1. पोलिसांच्या हाती लागलेले संशयितांच्या वास्तव्याचे पत्ते, आधार कार्ड, ओळखपत्रेही बनावट असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
2. रितेशकुमार याचे वास्तव्य असलेल्या दोन घरांचीही झडती घेण्यात आली, पण पथकाच्या हाती काहीही लागले नाही.
3. तपास अधिकारी तथा करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी सायंकाळी कोल्हापूर पोलिस पथकातील अधिकार्यांशी संपर्क साधून तपासाच्या अनुषंगाने आढावा घेतला.