

कोल्हापूर : जिल्ह्यातील प्रख्यात व्यावसायिक फर्मच्या व्यवस्थापकांशी व्हॉटस् ॲपद्वारे संपर्क साधून ‘सीईओ’ बोलत असल्याचे भासवून नवीन व्यावसायिक कॉन्ट्रक्टच्या बहाण्याने २ कोटी ३६ लाखाला गंडा घालणाऱ्या आंतरराज्य सायबर गुन्हेगारी टोळीचा कोल्हापूर सायबर क्राईम सेलने पर्दाफाश केला. गुजरातसह उत्तर प्रदेशमध्ये छापेमारी करून पथकाने ५ संशयितांना जेरबंद केले. विविध बँकांमधील ८२ लाखांची रक्कमही गोठविण्यात आली आहे.
मुख्य संशयित राजेश ऊर्फ डी. के. गिरधारीलाल गुरनानी (वय ५३, रा. सरदारनगर, अहमदाबाद), भावीन हर्षदभाई खांडेरा (२३, अहमदाबाद), देव परेशभाई त्रिवेदी (२४, अहमदाबाद), जतीन अशोक कुमारपाल (२०, खोकरा, अहमदाबाद, गुजरात), अर्पित रामकुमार पांडे (२३, अहमदाबाद, मूळ अकबरपूरनगर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. टोळीत आणखी काही सायबर भामट्यांचा सहभाग असावा, असा संशय आहे.
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील व्यावसायिक फर्मच्या व्यवस्थापकाला व्हॉटस्ॲपद्वारे संपर्क साधून कंपनीचा ‘सीईओ’ बोलत असल्याचे भासवून २ कोटी ३६ लाखांची रक्कम ट्रान्स्फर करवून घेत फसवणूक करण्यात आली होती. कंपनी व्यवस्थापकांनी दि. ४ जुलैला गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मुख्य संशयित राजेश गुरनानीसह टोळीने महाराष्ट्राशिवाय अन्य राज्यांतही बड्या कंपन्यांसह व्यापारी, उद्योग, व्यावसायिकांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचा संशय आहे. टोळीकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. फसवणुकीची व्याप्ती लवकरच चव्हाट्यावर येईल, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक संजय हारूगडेसह पथकाने छापेमारी करून टोळीचा पर्दाफाश केल्याचे त्यांनी सांगितले.
संशयितांना पोलिस कोठडी
या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षकांनी सायबर क्राईम सेलकडे सोपविल्यानंतर पथकाने आंतरराज्य टोळीचा भांडाफोड केला. संशयिताना बेड्या ठोकून पथकाने कंपनीच्या नावाचे बनावट शिक्के, विविध बँकांची पासबुक, दस्तऐवजही हस्तगत केले आहेत. न्यायालयाने संशयितांना पोलिस कोठडी दिली आहे.