बनावट दारू तस्करांच्या आंतरराज्य टोळ्या मोकाट

कोल्हापूर बनतेय सेंटर : मास्टरमाईंड कारवाईपासून दूरच; महामार्गावर गुन्हेगारांचा कब्जा
Interstate counterfeit liquor smuggling case
बनावट दारू तस्करांच्या आंतरराज्य टोळ्या मोकाटPudhari File Photo
Published on
Updated on
दिलीप भिसे

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि गोव्यासह राजस्थान, गुजरात आंध्रातील आंतरराज्यीय बनावट दारू तस्करी टोळ्यांनी मुंबई-बंगळूर आणि रत्नागिरी-सोलापूर महामार्गावर कब्जा केला आहे. याशिवाय स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून जिल्ह्यात चोरट्या मार्गाचा वापर करून तस्करीचा आलेख वाढत असतानाही आंतरराज्यीय मास्टरमाईंड मात्र कारवाईपासून दूरच असल्याचे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील चित्र आहे. पंटर्सना बेड्या; मात्र आंतरराज्यीय तस्करांना मोकळीकर, अशी चर्चा सुरू झाली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतरच्या काळातही कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आंतरराज्य तस्करी टोळ्यांच्या आर्थिक उलाढाली वाढू लागल्याचे चित्र आहे. भेसळ आणि गोवा बनावटीच्या दारूचे जिल्ह्यासह ग्रामीण भागाला रतीबच लागले आहे. सीमावर्ती भागासह जिल्ह्याच्या चारही प्रमुख मार्गांवर रात्र-दिवस कडेकोट सुरक्षा यंत्रणा कार्यरत असतानाही गोवा बनावट दारूच्या तस्करीत कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येते. तस्करीतील उलाढालीसाठी सीमाभागासह कर्नाटक व गोव्यातील आंतरराज्य टोळ्यांनी कोल्हापूरला तस्करीचे सेंटरच बनविल्याचे उघड झाले आहे.

आंतरराज्य तस्करी टोळ्यांचे आव्हान; प्रशासन यंत्रणा हतबल

कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गावरून होणारी बेधडक तस्करी रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिस दलासह राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने आंतरराज्य तस्करी टोळ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. गतवर्षी 2024 मध्ये दारू तस्करीच्या 1 हजार 750 गुन्ह्यांत दीड हजारावर संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या. कोट्यवधीचा दारूसाठा हस्तगत करूनही जिल्ह्यात आंतरराज्य तस्करी टोळ्यांची दहशत काही केल्या कमी झाली नाही. उलट त्यात वाढच होत राहिल्याचे चित्र आहे. परिणामी, यंत्रणा हतबल झाली की काय, अशी चर्चा आहे.

रायगड जिल्ह्यातील गुन्हेगार महामार्गावर एमडी ड्रग्जसह जेरबंद

आठवड्यापूर्वी सांगली फाटा-पंचगंगा पूलदरम्यानच्या मार्गावर पालघर (जि. रायगड) येथील कुख्यात गुंडाला जेरबंद करून त्याच्याकडून 75 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले. बनावट दारूसह गांजा, अमली पदार्थ तस्करांचा महामार्गासह जिल्ह्यात सुळसुळाट झाला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील कुख्यात टोळ्यांतील गुन्हेगार कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. जामिनावर सुटल्यानंतर अथवा शिक्षा भोगल्यानंतर हेच गुन्हेगार गुन्हेगारी कारवाईसाठी कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्याला येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. परिणामी, शहरासह जिल्ह्यात नामचिन गुन्हेगारांचा दिवसेंदिवस वावर वाढत चालला आहे, हे चित्र जिल्ह्याच्या द़ृष्टीने घातक ठरत आहे. (उत्तरार्ध)

भेसळयुक्त दारूसह गांजा, अमली पदार्थ तस्करी टोळ्यांची जिल्ह्यात दहशत

बनावट दारू तस्करांसह जिल्ह्यात अलीकडच्या काळात गुटखा, गांजा आणि अमली पदार्थ तस्करांची दहशत वाढल्याचे दिसून येते. गतवर्षी 2024 मध्ये पुणे-बंगळूर महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने 18 लाख 23 हजारांचा दारूसाठा जप्त करून तिघा तस्करांना बेड्या ठोकल्या. पाठोपाठ इचलकरंजीत 12 लाख 50 हजारांचा गुटखा हस्तगत करण्यात आला. 13 जुलै 2024 मध्ये साडेचार लाखांचा गांजा जप्त करून उस्मानाबाद येथील तस्कराला बेड्या ठोकण्यात आल्या.

कोल्हापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यातही रॅकेट!

विनासायास मुबलक पैसा मिळवून देणार्‍या बनावट दारू तस्करीत व्हाईट कॉलर माफियासह 17 ते 25 वयोगटातील युवकही गुरफटू लागले आहेत. विशेषकरून गोवा बनावट दारूसह गांजा व अमली पदार्थ तस्करीत कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील गुन्हेगारी कारनाम्यांचे रेकॉर्ड असलेले स्थानिक गुन्हेगारही सक्रिय होऊ लागले आहेत. राजकीय आश्रय, वरिष्ठांकडून मिळणार्‍या आश्रयामुळे पश्चिम महाराष्ट्रात तस्करी उलाढालीत मोठे रॅकेट उदयाला येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news