

कोल्हापूर : अपघाताने निधन झालेल्या आठ शेतकर्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशांचे वितरण बँकेचे अध्यक्ष, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत स्वभांडवलामधून पीक कर्ज घेणार्या अडीच लाख शेतकर्यांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा बँकेने उतरविला होता. विमा हप्त्याची एक कोटींची रक्कम शेतकर्यांकडून न घेता बँकेने नफ्यातून भरली आहे. आतापर्यंत मृत शेतकर्यांच्या वारसांना पाच कोटींहून अधिक विमा रक्कम मिळाली आहे.
शेतकरी हा जिल्हा बँकेचा आत्मा आहे. सर्पदंश, विजेचा धक्का, औषध फवारणी, जनावरांचे हल्ले अशा कारणांमुळे तसेच अपघाताने शेतकर्यांचे दुर्दैवी मृत्यू होतात. अशा संकटग्रस्त परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून बँकेने प्रत्येक शेतकर्याला दोन लाख रुपये विमासुरक्षेची योजना सुरू केली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणवीरसिंग गायकवाड, श्रुतिका काटकर, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप लोखंडे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.