टोप : पुढारी वृत्तसेवा
टोप भूमापन नगर कार्यालयातील अधिकारी तुषार सोनवणे (वय ४५) (रा. सांगली) हे आज (मंगळवार) सकाळी नागाव येथील क्षेत्राची मोजणी करण्यासाठी त्यांचा सहकारी अमर चौगुलेसह होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख बापू साळुंखे यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबपवाडी येथील तक्रारदार यांनी नगरभूमापन कार्यालयाचे अधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडे वारसा हक्क नोंदणीसाठी अर्ज केला होता. यावेळी सोनवणे यांनी आठ हजार रुपयाची लाच मागितली. दोघांच्या तडजोडीने 4000 रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम नागाव येथे घेऊन येण्यास तक्रारांना सांगितले होते. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला या विषयी कळवले. आज (मंगळवार) दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावून सोनवणे याला चार हजार रुपयांची लाच घेताना पकडले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा पंटर अमर चौगुले (रा. हातकणंगले) हा देखील होता.
सदरची कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील अतिरिक्त कार्यभार असणारे पोलीस उपाधीक्षक बापू साळुंखे यांच्यासह सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, सुनील मोरे, पोलीस हवालदार विकास माने, सुनील घसाळकर, सुधीर पाटील यांच्या पथकाने केली.