

कोल्हापूर : भारतामध्ये रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये संरक्षण आहे. कुत्र्यांच्या हत्येविरोधात प्राणिमित्र संघटना न्यायालयात गेल्याने 2001 मध्ये कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला लगाम घालण्यासाठी ‘प्राणी जन्म नियंत्रण’ नियमांना कायदेशीर स्वरूप देण्यात आले.
निर्बीजीकरण आणि लसीकरणाद्वारे जन्मदर घटविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर निश्चित करण्यात आली आहे. याखेरीज भारतीय दंडसंहितेमध्ये कलम 428 व 429 अन्वयेही त्यांना संरक्षण आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही रस्त्यांवरील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली असून, भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे निर्माण करून त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. कोल्हापुरात सध्या कुठेही जा, गल्लीबोळांच्या कोपर्यावर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळतील.
सायंकाळी हे चित्र अधिक गंभीर बनते आणि उपनगरीय भागांत तर भीतीने रस्त्यावरून चालणेही मुश्कील झाले आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. सरकारी दवाखान्यात लस मिळवताना आटापिटा करावा लागतो. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेने निर्बीजीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याचे कितीही खुलासे दिले, तरी त्यावर ठोस नियंत्रण आणले जात नाही. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पुढाकार घेऊ शकतात.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीम, लेसर आणि ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर खुले व्यासपीठ उभारून होणार्या कार्यक्रमांवर लाखो रुपये खर्च होतात. अलीकडे या प्रकारच्या आकर्षणावर आणि लाखो रुपयांच्या उधळणीवर सार्वजनिक मंडळांमध्ये जणू स्पर्धाच लागली आहे. साऊंड सिस्टीममुळे नागरिकांना मिरवणुकीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची अनेक उदाहरणे आहेत. नागरिकांना बहिरेपण येत असल्याचे पुरावे आता गल्लोगल्ली उपलब्ध आहेत आणि लेझरमुळे द़ृष्टी गमावण्याचाही धोका आहे. गेल्या काही वर्षांत ‘मिरवणूक म्हणजे साऊंड सिस्टीम-लेसर’ हे नव्याने निर्माण झालेले समीकरण बदलून समाजाला ज्याची गरज आहे, अशा कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची चळवळ जर कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हाती घेतली, तर कोल्हापूरच्या पुरोगामी चळवळीला ती एक नवी झळाळी ठरू शकते.
खर्चाचा पुनर्विचार करण्याची वेळ
सध्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये साऊंड सिस्टीम, लेसर शो आणि आकर्षक रोषणाईवर लाखो रुपयांची उधळण केली जाते. यावर मंडळांमध्ये एक प्रकारची स्पर्धाच लागलेली दिसते. मात्र, या गोष्टींचे दुष्परिणामही तितकेच गंभीर आहेत. साऊंड सिस्टीमच्या दणदणाटाने हृदयविकाराचे झटके येणे, नागरिकांना बहिरेपणा येणे असे प्रकार वाढले आहेत, तर लेसरच्या तीव्र प्रकाशामुळे द़ृष्टी गमावण्याचा धोकाही विज्ञान वारंवार अधोरेखित करत आहे. समाजाकडून गोळा केलेल्या पैशातून जर समाजालाच शारीरिक आणि मानसिक त्रास होणार असेल, तर या खर्चाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. हीच रक्कम जर मंडळांनी आपापल्या परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या निबीर्र्जीकरणासाठी वापरली, तर उत्सवाला एक विधायक आणि रचनात्मक स्वरूप प्राप्त होईल.