

कोल्हापूर : ऊसतोडीसाठी परजिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या गर्भवती मजूर महिलेच्या मृत्यूने एक नवजात जीव जन्मताच पोरका झाला. नियतीने हिरावून घेतलेली आईची माया समाजाने आपल्या ऊबदार हृदयाने परत दिली, ती दूधआईच्या प्रेमातून. चार दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या कोवळ्या कळीला मिळालेला मानवी मायेचा स्पर्श तिच्या नवजीवनाला नव्या आशेचा आधार ठरला. आईच्या निधनानंतर केवळ काही तासांतच जगण्याची पहिली लढाई सुरू करणाऱ्या या मुलीची व्यथा काळजाला चटका लावणारी असली, तरी तिच्यासाठी उभ्या राहिलेल्या माणुसकीची शिदोरी समाजाला हेलावून टाकणारी आहे.
कर्जाच्या परतफेडीचे ओझे आणि उदरनिर्वाहाची धडपड यामुळे ती पतीसह ऊसतोडीच्या टोळीत दाखल झाली होती. उसाच्या फडातच दोन मुली आणि पतीसोबत आनंदाने दिवाळी सणही साजरा केला. दरम्यान, झालेल्या पावसामुळे शेतात चिखल झाला होता. याच चिखलातून पहाटेच्या अंधारात ती रोज फडात ऊसतोडीला जात होती. मात्र, 6 नोव्हेंबरला याच चिखलावरून तिचा पाय घसरला आणि ती पोटावर पडली. क्षणातच तिच्या प्रसूतीवेदना जीवघेण्या संघर्षात बदलल्या. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांना बाळाला वाचवता आले; अतिरक्तस्रावामुळे आईचे प्राण मात्र गेले.
जगात नवे पाऊल टाकताच आईविना राहिलेल्या या 7 व्या महिन्यातल्या चिमुकलीची नाजूक अवस्था होती. पेटीत ठेवून तिच्यावर चार दिवस डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार झाले. अशावेळी तिच्या दुधाच्या गरजेसाठी उद्यमनगरमधील गीता पाटील या दूधआई पुढे सरसावल्या. अनोळखी चिमुकलीला त्यांनी स्वतःच्या लेकरांप्रमाणे उराशी धरले, दूध पाजले. त्यांच्या प्रेमाच्या ओलाव्याने या नवजीवनाला जणू जगण्याचा नवा श्वास मिळाला.