

Uday Samant Nrusinhwadi visit
नृसिंहवाडी : राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते उदय सामंत यांनी आज (दि. ६) सायंकाळी नृसिंहवाडीस भेट देत श्री दत्त मंदिरात दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी मंदिरात पूजाअर्चा केली व दत्तचरणी नतमस्तक झाले. दत्त देवस्थानतर्फे अध्यक्ष वैभव काळू पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांनी मंदिरासंदर्भात व विकासाच्या दृष्टिकोनातून देवस्थान विश्वस्तांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, तालुकाप्रमुख सतीश मलमे, युवासेनेचे राकेश खोंद्रे, संजय पुजारी, संतोष खोंबारे, गुरुप्रसाद पुजारी, अभिजीत जगदाळे, प्रवीण दळवी, अमर नलवडे, प्रवीण आणुजे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वतंत्र निवडणुकांची चाचपणी?
मंत्री उदय सामंत हे सध्या सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांना कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) म्हणून स्वतंत्र लढवण्याविषयी चाचपणी सुरू असल्याचे बोलले जात आहे. शिरोळ तालुक्यात आ. राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदेसेना पुरस्कृत आमदार आहेत. त्यामुळे यड्रावकर गटाची स्वतंत्र ताकद व शिवसेनेचे संघटनात्मक बळ या जोरावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली जाऊ शकते का? याची चाचपणी सुरू आहे.