

कोल्हापूर : कागल पंचतारांकित एमआयडीसीमधील कारखानदार रवींद्र रायकर (वय 42) यांच्या कसबा बावडा येथील अभिदीप रेसिडेन्सी संकुलातील तिसर्या मजल्यावरील फ्लॅट चोरट्यानी भरदिवसा फोडला. बेडरूममधील साडेतीन तोळ्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड असा 5 लाख 99 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला. मध्यवर्ती व गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माहीतगाराने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे.
रायकर यांचा कागल एमआयडीसीमध्ये स्वत:चा कारखाना आहे. गुरुवारी सकाळी कारखान्यात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने रायकर हे पत्नी व मुलासमवेत सकाळी कारखान्यात गेले होते, तर मुलगी शाळेला गेली होती. त्यामुळे फ्लॅट कुलूप बंद होता. सकाळी 9.45 ते सायंकाळी 5 या वेळेत चोरटा लिफ्टमधून तिसर्या मजल्यावर आला. लिफ्टच्या दर्शनी बाजूस असलेले रायकर यांच्या मालकीच्या फ्लॅटच्या प्रवेशद्वाराचे कुलूप कटावणीने तोडून काढले. खोलीत प्रवेश करून बेडरूमधील साडेतीन तोळ्याचे दागिने व 3 लाख 50 हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. चोरट्याने लुटलेल्या दागिन्यांत सोन्याचा नेकलेस, सोन्याच्या दोन अगंठ्या, कर्णफुले, सोन्याचे आठ मणी, चांदीची पैंजण जोड, ब—ेसलेट, चांदीच्या बिस्किटांचा समावेश होता.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकांसह ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. माहीतगाराने हे कृत्य केले असावे, असा तपास अधिकार्यांचा संशय आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. चोरट्याचा लवकरच छडा लावणे शक्य आहे, असे डोके यांनी सांगितले.