

विकास कांबळे
कोल्हापूर : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा बोजवारा उडाल्याने त्याचा फटका मंत्री, आमदारांनाही बसला. नागपूरकडे जाणारी विमानसेवा विस्कळीत झाल्याने जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांची मोठी अडचण झाली. त्यामुळे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाण्यासाठी पर्याय शोधण्याची वेळ सर्वांवर आली. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कारने नागपूरला जाणे पसंत केले तर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट रेल्वेचा पर्याय निवडत नागपूर गाठले.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार, दि. 8 पासून नागपूर येथे सुरू होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी आमदार मुंबईतून किंवा पुण्यातून नागपूरला विमानाने जात असतात. त्यामुळे हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला जाणारी विमाने फुल्ल असतात. अशा परिस्थितीत इंडिगो विमानसेवेचा बोजवारा उडाल्यामुळे राज्यातील सर्व मंत्री, आमदार यांना नागपूरला जाण्यासाठी पर्याय शोधावा लागला. याला कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्रीही अपवाद ठरले नाहीत. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी थेट कारची किल्ली फिरविण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे हजार-बाराशे कि.मी.चा प्रवास आपल्या ताफ्यासह पार करत नागपूर गाठले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचा विमानानंतर सर्वात आवडता प्रवास रेल्वेचा आहे. त्यामुळे कोल्हापुरातून मुंबईला जाताना किंवा येताना ते रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात.
हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाण्याकरिता त्यांनी रेल्वेनेच प्रवास केला. शनिवारीच ते नागपूरला पोहोचले. मंत्र्यांप्रमाणेच जिल्ह्यातील आमदारांना पर्यायांचा आधार घ्यावा लागला. त्यांची फार वेगळी परिस्थिती नाही. आमदार अमल महाडिक शनिवारीच कारने नागपूरला गेले. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कारने नागपूरकडे जाण्यासाठी निघाले. आमदार राहुल आवाडेही कारने सोमवारी पहाटे निघणार असून आमदार जयंत आसगावकर यांनी कार ऐवजी खासगी आरामबसने प्रवास करणे पसंत केले. रविवारी रात्री ते एसी स्लीपर बसने कोल्हापुरातून निघाले. सोमवारी सकाळी ते नागपूरला पोहोचतील. आमदार शिवाजी पाटील मुंबईतून शनिवारी सकाळी कारने नागपूरकडे जाण्यासाठी निघाले. ते सकाळी नागपूरला पोहोचले. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर हे उदयपूरला गेले असल्याने तेथूनच ते विमानाने नागपूरला जाणार आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे व आमदार डॉ. अशोक माने हे विमानाने नागपूरला जाणार आहेत.
बसेस फुल्ल, दरही वधारले
हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला जाणारी विमाने फुल्ल असतात. मात्र विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे सर्वच जिल्ह्यांतून नागपूरकडे जाणार्या लक्झरी बसेस फुल्ल होत्या. त्यामुळे त्यांचे दरही चांगलेच वधारले होते.