Gokul News : ‘गोकुळ’मध्ये मताधिकारासह तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीचे संकेत

सत्ता काबीज करण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी; आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
Kolhapur Gokul News
Kolhapur Gokul News
Published on: 
Updated on: 

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडीचे प्रकरण न्यायालयात गेले असताना, राज्य सरकार ‘गोकुळ’मध्ये तज्ज्ञ‍ संचालकांची नियुक्ती करून आणि त्यांना मतांचा अधिकार देऊन अध्यक्षपद मिळविण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने बुधवारी (दि. ४) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून सध्या प्रचंड राजकीय घडामोडी सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या ‘राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी’ला २५ पैकी १३ जागा मिळाल्या आहेत, तर विरोधी महायुती आघाडीला १२ जागा मिळाल्या आहेत. मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आयोजित सभेला महायुती आघाडीचा एकही संचालक हजर राहिला नाही. त्यामुळे कोरमअभावी अध्यक्ष निवड वादात सापडली आहे.

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांची समांतर सभेत अध्यक्षपदी निवड केली. आता हे प्रकरण कोल्हापूर सर्किट बेंचपुढे गेले आहे. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही सत्ताधारी महायुतीने ‘गोकुळ’ ताब्यात घेण्याची खेळी रचली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘गोकुळ’मध्ये शासननियुक्त सदस्य नेमण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. ‘गोकुळ’वर शासननियुक्त ८ सदस्य नेमण्याची मागणी पत्रात केली आहे.

...तर अध्यक्ष महायुतीचा

बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चार तज्ज्ञ‍ संचालक नेमण्याचा निर्णय होऊ शकतो. शासननियुक्त संचालक म्हणून महायुतीकडून शौमिका महाडिक, हसन मुश्रीफ यांचे पुत्र नवीद मुश्रीफ, ए. वाय. पाटील आणि अशोक फराकटे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. जर मंत्रिमंडळाने ४ किंवा त्यापेक्षा जास्त संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार दिला, तर ‘गोकुळ’मधील बहुमताचे समीकरण बदलू शकते आणि महायुतीचा अध्यक्ष बसू शकतो, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.