कोरोना विषाणूला अलग करण्यात भारतीय संशोधकांना यश!

पुण्याच्या शास्त्रज्ञांनी विषाणूच्या मुसक्या बांधल्या : ओमिक्रॉनच्या चार उपप्रकारांना शोधले
indian-researchers-successfully-isolate-coronavirus
कोरोना विषाणूला अलग करण्यात भारतीय संशोधकांना यश!Pudhari File Photo
Published on
Updated on
राजेंद्र जोशी

कोल्हापूर : देशात कोरोना विषाणूने पुन्हा डोके वर काढले असले तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची वा धसका घेण्याची कोणतीही गरज नाही. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) संशोधकांनी कोरोनाच्या नव्या विषाणूच्याही मुसक्या बांधण्यात यश मिळविले आहे. या विषाणूला अलग करण्यामध्ये यश मिळविल्यानंतर त्याची गुणसूत्रीय संरचना अभ्यासण्याचे काम सुरू आहे. यानंतर या विषाणूच्या मुसक्या बांधण्यासाठी नवी लस आवश्यक आहे की नाही याची खातरजमा केली जाणार आहे. गरज भासल्यास नवी लसही अल्पावधीत उपलब्ध होऊ शकते, असे अभ्यासकांचे मत आहे.

कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात 2019-20 च्या सुमारास भारतीय विषाणू विज्ञान संस्थेच्या संशोधकांनी कोरोनाच्या ‘डेल्टा’ या विषाणूला अशाचप्रकारे अलग करण्यामध्ये यश मिळविले होते. या विषाणूच्या मदतीने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था (आयसीएमआर) व हैदराबाद स्थित भारत बायोटेक या कंपनीच्या सहयोगातून कोरोनावरील पहिली अस्सल भारतीय बनावटीची लस अस्तित्वात आली. त्याने भारतालाच नव्हे तर जगाला दिलासा दिला होता.

भारत हा जगातील लस निर्मितीच्या क्षेत्रातील एक हब म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रावर भारतीय संशोधकांची हुकूमत आहे. एनआयव्हीच्या संशोधकांनी भारतात गेल्या तीन महिन्यांमध्ये नागरिकांना त्रस्त करू पाहणार्‍या कोरोना विषाणूला अलग करण्यामध्ये यश मिळविले आहेच. शिवाय, सिंगापूरमध्ये मोठे उपद्रवमूल्य दिलेल्या आणि भारतात रुग्णाच्या नमुन्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या प्रतिरूपालाही अलग करून त्याच्या गुणसूत्रीय संरचनेचा अभ्यास सुरू केला आहे.

एनआयव्हीच्या संशोधकांनी कोरोना विषाणूला अलग करण्यात यश मिळविल्यानंतर त्याच्या गुणसूत्रीय संरचनेमध्ये ‘ओमिक्रॉन’ या विषाणूंचे ‘एनएफ.7’, ‘एक्सएफजी’, ‘जेएन.1.16’ आणि ‘एनबी.1.8.1’ हे चार उपप्रकार शोधून काढले आहेत.

चतु:सूत्रीचा अवलंब करावा

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते भारतात सध्या सुरू असलेली कोरोनाची रुग्ण संख्या वाढ ही एक लघुतरंग आहे. कोरोना विषाणू नेहमीच्या एन्फ्लुएन्झाच्या विषाणूप्रमाणे वागत आहे. साहजिकच अशाप्रकारच्या छोट्या लाटांना सामोरे जाण्याची तयारी भारतीयांना ठेवावी लागेल. यासाठी सतत हात धुणे, तोंडाला मास्क वापरणे, मोठ्या गर्दीत जाणे टाळणे आणि आजाराची लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे या कोरोनाच्या चतु:सूत्रीचा अवलंब करावा लागेल. याखेरीज रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक ते उपाय अवलंबावे लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news