कासारवाडी : येथील लुगडे माळ परिसरात दहा गव्यांच्या कळप दाखल झाला असून जवळपास चार एकरातील शाळूची पिके फस्त करत आज (दि.२६) गव्यांनी परिसरात धुडगूस घातला आहे. त्यामुळे ठोस उपाययोजना करून वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कासारवाडी येथील घाटगे खोरी, लुगडे माळ, खाडे माळ, नावाच्या शिवारातील गोविंदा खोत, बाळू खाडे, पंडित घाटगे, सुखदेव घाटगे, संजय मोहिते तर सादळे येथील सिध्देश्वर मंदिर परिसरातील श्रीरंग पोवार, बाळकृष्ण पोवार या़च्या शेतातील जवळपास चार एकरातील शाळू गव्यांनी खाऊन फस्त केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी ,अंबपवाडी मनपाडळे तर करवीर तालुक्यातील सादळे मादळेमध्ये येतील शेती पिकांचे गव्यांच्या कळपाकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. शेतीची मशागत करत बियाण्यांचा खर्च करून आलेले पिक गव्यांच्या कळपाकडून फस्त केली जात आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. गव्यांचा कळपाकडून वारंवार या परिसरातल्या ज्वारी, मका या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हताश झाले झाले आहे. वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.