चंद्रावर 2035 मध्ये भारतीय अंतराळवीर पोहोचणार

‘इस्रो’चे डॉ. एस. व्यंकटेश्वर शर्मा; दै. ‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट
indian-astronaut-to-reach-moon-by-2035
कोल्हापूर ः भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) उपसंचालक, कार्यक्रम संचालक शास्त्रज्ञ डॉ. एस. व्यंकटेश्वर शर्मा यांनी सोमवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील उपस्थित होते. Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : भारतीय अध्यात्म आणि विज्ञान यांचा परस्परसंबंध असून, याच्या जोरावरच देशाने अवकाशात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ‘इस्रो’चे भारत स्पेस स्टेशनसंदर्भात काम सुरू आहे. 2035 मध्ये भारत पुन्हा एकदा चंद्रावर यशस्वी पाऊल ठेवेल, त्या ठिकाणच्या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून तेथे वस्ती करणे शक्य होणार असल्याचे मत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), यू. आर. राव सॅटेलाईट सेंटरचे उपसंचालक, कार्यक्रम संचालक शास्त्रज्ञ डॉ. एस. व्यंकटेश्वर शर्मा यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर दौर्‍यावर असताना सोमवारी सकाळी डॉ. शर्मा यांनी दै. ‘पुढारी’ मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी शास्त्रज्ञ डॉ. शर्मा यांचा शाल, ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. यावेळी दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, अंबाबाई मंदिरातील धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लीकर उपस्थित होते. डॉ. प्रतापसिंह जाधव व डॉ. योगेश जाधव यांनी डॉ. शर्मा यांच्यासमवेत अंतराळ संशोधन, ‘इस्रो’समोरील आव्हाने, आगामी नवीन उपक्रम या विषयांवर सखोल चर्चा केली.

शास्त्रज्ञ डॉ. शर्मा म्हणाले, ‘इस्रो’ची स्थापना 1962 मध्ये होमी भाभा, विक्रम साराभाई, पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रयत्नांतून झाली. काही वर्षांपूर्वी अमेरिकेसह इतर देशांनी भारताचे अवकाश तंत्रज्ञान नाकारले. अमेरिकेने 50 वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल ठेवले. त्यानंतर 35 वर्षांनी हे भारताला शक्य झाले. ‘इस्रो’ला सुरुवातीच्या काळात उपग्रह सोडण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागायचा. सद्य:स्थितीत ‘इस्रो’ने तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असून, एका दिवशी 10 पेक्षा जास्त उपग्रह अवकाशात सोडले जात आहेत, ही ऐतिहासिक क्रांती आहे. चंद्रयान, मंगलयान, गगनयान, सूर्ययान यातील प्रत्येक मोहिमेवर काम करणे शास्त्रज्ञांसमोरील आव्हान आहे.

अवकाश संशोधनात भारत आत्मनिर्भर बनला असून, इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज राहिलेली नाही. 2012 नंतर ‘इस्रो’ने ग्लोबल स्पेस व हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर सुरू केला आहे. ‘इस्रो’ने चंद्राच्या पश्चिम भागावर यान पाठवून जगात इतिहास रचला आहे. पूर्वी भारताचा जागतिकस्तरावर स्पेस मार्केटमध्ये 2 टक्के वाटा होता, तो आता 12 टक्क्यांवर पोहोचला आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्ससह इतर विकसित देश अवकाश उड्डाणासाठी भारताच्या अवकाश केंद्राचा वापर करीत आहेत. भारतातून अवकाशात यान पाठविण्याचा खर्च इतर देशांच्या तुलनेत फार कमी असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. शर्मा यांनी सांगितले.

‘इस्रो’चे कार्य केवळ अवकाशात उपग्रह सोडणे ऐवढ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही, असे सांगून शास्त्रज्ञ डॉ. शर्मा म्हणाले, ‘इस्रो’ने अंतराळात सोडलेल्या उपग्रहामुळे जीपीएस सिस्टीम अधिक सक्रिय बनली असून, याचा 140 कोटी भारतीयांना उपयोग होत आहे. याच्या माध्यमातून भूकंप, हवामान बदल, पाऊस यासह इतर गोष्टींचे अचूक अनुमान लावणे शक्य झाले आहे. ‘इस्रो’च्या तंत्रज्ञानाचा आता ड्रोन बनविणे, ऑटोमोबाईल, वैद्यकीय क्षेत्रालादेखील फायदा होत आहे.

‘पुढारी’ माध्यम समूहाचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान

दै. ‘पुढारी’चे संस्थापक संपादक डॉ. ग. गो. जाधव यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. 80 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या दै. ‘पुढारी’चा आज माध्यम समूह बनला आहे. ‘पुढारी’ माध्यम समूहाने लोकांना जागरूक करण्याबरोबरच देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार शास्त्रज्ञ डॉ. शर्मा यांनी काढले.

अवकाश संशोधन क्षेत्रात काम करणे मोठे आव्हान

नैसर्गिक आपत्ती ओळखणे, त्याचबरोबर बदलत्या हवामानाला आवश्यक पिके, शेती उत्पन्न कशाप्रकारे घेता येईल, यासाठीदेखील उपग्रहांची मदत घेतली जात आहे. समुद्राच्या बदलत्या स्वरूपामुळे मासेमारी करताना अडचणी येतात, त्या उपग्रहांच्या मदतीने सोडविण्याचे आव्हान असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. शर्मा म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news