

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. मात्र, वयामुळे येणाऱ्या अडचणी, प्रवासाचा त्रास आणि बायोमेट्रिक पडताळणीतील अडथळे यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर भारतीय डाक विभाग, इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक (आयपीपीबी) आणि केंद्र सरकारच्या पेन्शन विभागाच्या माध्यमातून हयातीचा दाखला सादर करण्याची सुलभडिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सुविधेअंतर्गत पेन्शनधारकांना पोस्टमनला घरी बोलावून किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होणार आहे.
चेहरा ओळख पडताळणीमुळे प्रक्रिया सुलभ
वाढत्या वयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नसल्याने बायोमेट्रिक पडताळणी करताना अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन हयातीचा दाखला सादर करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख पडताळणी) ही सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक पडताळणीत अडचणी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहीम
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करणे सुलभ व्हावे, यासाठी डाक विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगाने डाक विभागामार्फत 'Nationwide Digital Life Certificate (DLC) Campaign 5.0' ही मोहीम दि. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांनी या डिजिटल सुविधेचा आणि विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर वैभव वाघमारे यांनी केले आहे.