

राजेंद्र जोशी
कोल्हापूर : जागतिक पटलावर 66 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या आणि संपूर्ण जगाला भीतीच्या छायेखाली लोटणार्या ‘एचआयव्ही’वर नियंत्रण मिळविण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतात सर्वसामान्यांना परवडणार्या दरामध्ये इंजेक्शनचे डोस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे एचआयव्हीवर नियंत्रणाचा मार्ग मोकळा होईल आणि योग्य दक्षता घेतली, तर हा संसर्गजन्य आजार जगातून हद्दपार करणेही शक्य होईल.
‘लेनाकॅपावीर’ हे या नव्या औषधाचे नाव आहे. अमेरिकेतील गेलार्ड सायन्सेस या बायोटेक कंपनीने विकसित केलेले हे औषध इंजेक्शन स्वरूपाचे आहे. या इंजेक्शनचे वर्षातून दोन डोस घेतले, तर हे औषध एचआयव्हीला प्रतिबंध करू शकते. हे औषध क्लिनिकल चाचण्यांमध्ये 100 टक्के प्रभावी ठरले आहे. याचा वापर सध्या अमेरिकेत सुरू असून, त्याच्या दोन डोसची किंमत सुमारे 28 हजार डॉलर इतकी आहे. परंतु, या औषधाचा जगातील गोरगरीब रुग्णांना लाभ व्हावा, याकरिता गेलार्ड लाईफ सायन्सेसने गतवर्षी जगातील सहा उत्पादकांना 120 अल्प व निम्न मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये हे औषध पुरविण्यासाठी विनास्वामित्व हक्क (रॉयल्टी फ्री) परवाने दिले होते.
या सहा उत्पादकांमध्ये भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि हेट्रो लाईफ सायन्सेस या दोन कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी बुधवारी (दि. 24 सप्टेंबर) संंबंधित एचआयव्ही प्रतिबंधक औषधाचा ‘लेनाकॅपावीर’ हा जेनेरिक ब्रँड बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. त्याची वार्षिक किंमत केवळ 40 डॉलर (सुमारे 3 हजार 500 रुपये) ठेवण्यात आली असून, आरोग्य जगतामध्ये हे सर्वात मोठे पाऊल म्हणून ओळखले जाते आहे.
गेलार्ड लाईफ सायन्सेसचे डॉक्टर रेड्डीज लॅब व हेट्रो लाईफ सायन्सेस भारतात एचआयव्ही उत्पादन सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे, हे औषध लॅटिन अमेरिकेत सवलतीच्या दरात उपलब्ध होणार नाही. भारतात मात्र हे औषध अतिस्वस्तात उपलब्ध होईलच; पण त्याचबरोबर दीर्घकालीन ठाण मांडून बसलेल्या एचआयव्हीला हद्दपारही करू शकते.