कोल्हापूर : हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या केबिनची सफाई करताना महिला कामगाराशी अश्लील वर्तन केले आणि जाब विचारताना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रंकाळा परिसरातील सिद्धी आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉ. अतुल लक्ष्मीदास सोमय्या (वय 55) व त्यांच्या पत्नी दीपा अतुल सोमय्या (48, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) यांच्याविरुद्ध शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, डॉ. दीपा सोमय्या यांनीही हॉस्पिटलमधील पीडितेसह चार महिला कर्मचार्यांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे, असे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी रात्री सांगितले. शनिवारी ही घटना घडली. पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी दुपारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या केबिनची स्वच्छता करीत असताना डॉ. अतुल सोमय्या अचानक केबिनमध्ये आले. पाठीमागून आलेल्या डॉक्टरांनी शरीरास स्पर्श करून लज्जास्पद वर्तन केले. मी तुला घर बांधून देतो. तू मला आवडतेस, तुला पत्नीप्रमाणे ठेवीन, असे बरळत त्यांनी अश्लील वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घडलेल्या प्रकाराबाबत याच रुग्णालयात काम करणार्या बहिणीच्या निदर्शनास हा प्रकार तिने आणून दिला. त्यांनी संबंधित डॉक्टरला जाब विचारताच डॉक्टर सोमय्या व त्याच्या पत्नीने शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने दोघींना मारहाण केली. शिवाय टेबलवरील प्लॉवर पॉटने फिर्यादीसह बहिणीला डोक्यात मारहाण करून जखमी केल्याचेही तपासाधिकारी दिलीप पवार यांनी सांगितले. दरम्यान, डॉक्टर सोमय्या यांच्या कृत्याची माहिती मिळताच पीडित महिलेच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर रात्री उशिरा मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता.