

कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिकचे क्षेत्रच असे आहे की, काल घेतलेली वस्तू आज जुनी होते. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेटसह अन्य वस्तू लगेच बदलून नवीन घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. यातूनच इलेक्ट्रॉनिक कचर्याचे भयावह संकट घोंगावत आहे. कोल्हापूर शहरातून वर्षागणीक सुमारे 6 हजार किलो ई-कचरा तयार होत संकलित कचरा रिसायकलिंग कंपनीकडे पाठवला जातो. राज्यभरातून गोळा झालेल्या ई-कचर्यापैकी गतवर्षी 26 हजार 710 मे. टन कचरा रिसायकल झाला. कोल्हापूरसह राज्यात वाढते ई-कचर्याचे प्रमाण पाहता कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी आणखी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
कोल्हापूरसह राज्यभरातून तयार होणार्या ई-कचर्याचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत वाढले आहे. राज्यात सन 2023 मध्ये ई-कचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञान असलेल्या 222 उद्योगांना ई-कचर्याचे भाग सुटे करणे व त्याचे पुनश्चकरण करण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्यात गतवर्षी 26 हजार 710 मे. टन ई-कचर्याचे भाग सुटे व पुनश्चकरण करण्यात आले.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचर्याला ई-कचरा म्हणतात. जुने बंद पडलेले मोबाईल असो, संगणकाचे सुटे पार्ट असो, खराब झालेले की बोर्ड, माऊस, टी.व्ही., फ्रिज, मायक्रोव्हेव, केबल्स, घड्याळांचे पार्ट, कॅलक्युलेटर या सर्व नादुरुस्त वस्तू कचर्यात फेकून दिल्या जातात. या सार्या कचर्याला ई-कचरा म्हणतात.