

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : कासारी पाणलोट क्षेत्रात पावसाने आज जोर धरला असून दोन दिवसांत ३ टक्क्यांनी तर सहा दिवसांत ४.४७ तक्यांनी कासारी धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. कासारी धरणाचा पाणीसाठा १५ टक्क्यांवर येऊन पोहचला होता. जुलैमध्ये पावासाने जोर वाढवला असल्याने ही पाणी पातळी २७.१३ टक्क्यांवर (Kasari Dam Water levels) आली आहे. गतवर्षी ही आकडेवारी ४४ टक्के इतकी होती. उशिरा का होईना पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने कासारी धरण व कासारी नदीकाठावरील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शाहूवाडी तालुक्यातील २२ आणि पन्हाळ्यातील ४१ गावांना वरदान ठरलेल्या कासारी मध्यम प्रकल्प २.७७ टीएमसीचा आहे. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र पाऊस उशिरा का होईना सुरू झाल्याने खालावलेल्या पाणीसाठ्यात होणारी वाढ सर्वांना दिलासा देणारी आहे. कासारी धरणाची गुरुवारी (दि ६) पाणीपातळी ६०८.२० मी असून पाणीसाठा २१.३१ दलघमी म्हणजे ०.७५ टीएमसी आहे. धरण सध्या २७.१३ टक्के इतके भरलेले आहे. दि ३० जुन रोजी २२.६६ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षी याच दिवशी धरणातील पाणीसाठा ३४.३० दलघमी म्हणजे १.२१ टीएमसी होता. यावेळी धरण ४४ टक्के भरले होती. गतवर्षीपेक्षा धरण २२ टक्क्यांनी कमी भरले आहे. धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत ४५ मिमी तर १ जूनपासून आज अखेर ७९९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच तारखेला धरण क्षेत्रात ११३६ मिमी पावसाची नोंद झाली होती. गतवर्षीपेक्षा यावर्षी ३३७ मिमी पाऊस कमी झाला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग पुर्णतः बंद असून पाणीसाठ्यात ३४ दलघमी वाढ झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरण लवकरच भरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Kasari Dam Water levels)