

सरवडे : राधानगरी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या सरवडे गावात किरकोळ चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तात्काळ व प्रभावी पोलिस बंदोबस्ताची मागणी होत आहे.
येथील गणेश मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर विद्यामंदिर शाळेतही चोरीचा प्रकार झाला. काही दिवसांपूर्वी तोडकर गल्लीतील एका महिलेच्या घरातून रोख रक्कम चोरीस गेली होती. तसेच काल (दि. 19) तोडकर गल्लीतील अर्जुन शितोळे यांच्या बंगल्याचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दरवाजाशेजारी ठेवलेली भांडी पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे चोरट्यांनी साहित्य टाकून घटनास्थळावरून पळ काढला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या सर्व किरकोळ चोरीच्या घटनांचा तात्काळ छडा लावून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठा दरोडा पडून आर्थिक, मानसिक अथवा जीवितहानी झाल्यानंतरच पोलिस यंत्रणा जागी होणार का, असा सवालही संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.