

कोल्हापूर : विश्वासार्हतेच्या जोरावर देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रामीण डाक पुरस्कारार्थी हे खर्या अर्थाने देशाचे नवरत्न आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय दूरसंवाद तसेच ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काढले.
ग्रामीण डाक सेवक संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डाक सेवा महासंचालक जितेंद्र गुप्ता, महाराष्ट्र सर्कल मुख्य पोस्ट मास्टर (जनरल) अमिताभ सिंग, पोस्टल सर्व्हिसेस बोर्डचे कार्मिक सदस्य सुवेंदुकुमार स्वैन, पोस्टल सर्व्हिसेस पुणे रिजनचे संचालक अभिजित बनसोडे व गोवा रिजनचे संचालक रमेश पाटील उपस्थित होते.
खा. शाहू महाराज म्हणाले, डाक विभाग हा खर्या अर्थाने जनतेशी नाळ जोडलेला विभाग असून पोस्टमन हे विश्वासार्हतेचे प्रतीक आहेत. खा. धनंजय महाडिक म्हणाले, देशात सुमारे नवीन 11 हजार पोस्ट कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. आजही पोस्टमनवरचा विश्वास कायम असणे उल्लेखनीय बाब आहे.
यावेळी मंत्री सिंधिया यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या सुहास पाटील, सुरेश नरके, शशिकांत महाजन, रोहिणी कंधारे, अमृता शेरेकर, अजीज मुजावर, महेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, जगन्नाथ राऊत आणि नागनाथ गायकवाड अशा दहा डाक सेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात लाल जॅकेट, टोपी, पोस्ट विभागाची प्रचलित बॅग, सन्मानचिन्ह (पत्र पेटी) व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन संजय सालेलकर यांनी केले. अमिताभ सिंग यांनी आभार मानले.
विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पोस्ट विभागाने कार्यरत राहावे
ग्रामीण भागात काम करताना पोस्टमनना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो; मात्र ते कधीही कर्तव्यात कसूर करत नाहीत. पोस्टात सामान्य नागरिकांची सुमारे 37 कोटी खाती उघडण्यात आली असून, त्यामध्ये तब्बल 21 कोटी रुपयांची बचत करण्यात आली आहे. देशात 1 लाख 65 हजार ग्रामीण डाक वितरण केंद्रे कार्यरत असून विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पोस्ट विभागाने कार्यरत राहावे, असेही मंत्री सिंधिया म्हणाले.