कोल्हापूर ः कोल्हापूरकरांसाठी वर्षअखेरीस खरेदी, खाद्य आणि मनोरंजनाचा महाउत्सव घेऊन येणार्या ‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’ चा शानदार शुभारंभ नागाळा पार्क येथील मेरी वेदर ग्राऊंडवर गुरुवार (दि. 26) रोजी झाला. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे संचालक स्वागत तोडकर यांचे सुपुत्र हार्दिक तोडकर, रॉनिक स्मार्ट वॉटर हीटरचे संचालक तानाजी पवार आणि क्रेझी आईस्क्रीमचे मार्केटिंग मॅनेजर प्रशांत पाटील, दैनिक ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर हे यावेळी उपस्थित होते.
‘सन मराठी’ हे कार्यक्रमाचे एंटरटेन्मेंट पार्टनर असून, हेल्थ पार्टनर ‘तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र’ आणि सह प्रायोजक ‘रॉनिक स्मार्ट’ तर आईस्क्रीम पार्टनर क्रेझी आईस्क्रीम आहेत. मेरी वेदर ग्राऊंडवर भव्य मंडप उभारण्यात आला असून, पहिल्याच दिवशी कार्निव्हलला कोल्हापूरकरांची उत्स्फूर्त गर्दी झाली होती. आकर्षक रोषणाई, रंगीबेरंगी मुखवटे आणि मंत्रमुग्ध करणारी सजावट यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले होते. या कार्निव्हलमध्ये 130 हून अधिक स्टॉल्स असून, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंटस्, फर्निचर, किचन वेअर, दागिने, सौंदर्य प्रसाधने, लोणची, मसाल्याचे पदार्थ, चहा, आयुर्वेदिक उत्पादने, हेल्थ प्रॉडक्ट यांसारख्या वैविध्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीचा आनंद एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.
कोल्हापुरी तांबडा-पांढरा, शाकाहारी-मांसाहारी पदार्थ, चौपाटीवरचे फास्टफूड आणि पारंपरिक स्वाद घेण्यासाठी कोल्हापूरकर गर्दी करताना दिसत आहेत. हा कार्निव्हल खवय्यांसाठी पर्वणी ठरत असून, खरेदीसह ते स्वादिष्ट पदार्थांचा मनमुराद आनंद घेत आहेत. पहिल्या दिवशी ‘बोल बच्चनचे बोल बच्चन’ या विश्वराज जोशी यांच्या धमाल विनोदी किस्स्यांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना खिळवून ठेवले. कार्निव्हल दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेला असून, त्यात कराओके, लावणी, लाईव्ह ऑर्केस्ट्रा आणि डीजे नाईटची धमाल अनुभवायला मिळणार आहे. लहान मुलांसाठी खास अॅम्युझमेंट पार्क आणि विविध खेळांच्या सुविधाही उपलब्ध असून, अनेक पालक मुलांसह या फेस्टिव्हलला हजेरी लावत आहेत. ‘सन मराठी’चे कलाकार कोल्हापूरकरांच्या भेटीस येणार
‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कॉन्स्टेबल मंजू’ या लोकप्रिय मालिकेतील प्रमुख अभिनेत्री मोनिका राठी (मंजू) आणि प्रमुख अभिनेता वैभव कदम (सत्या) तसेच दिनांक 13 जानेवारीपासून रात्री 8ः30 वाजता ‘जुळली गाठ गं’ या नव्या मालिकेतील प्रमुख कलाकार पायल मेमाने (सावी) आणि संकेत चिकटगावकर (धैर्य) हे सुद्धा कोल्हापूरकरांच्या भेटीस येणार आहेत.‘पुढारी कोल्हापूर कार्निव्हल 2024’ हा कोल्हापूरकरांसाठी केवळ खरेदीचा नाही, तर परिवारासाठी धमाल आनंद लुटण्याचा महोत्सव ठरत आहे. या कार्निव्हलला आपले कुटुंब आणि मित्रमंडळीसह नक्की भेट द्या, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’च्या वतीने करण्यात आले आहे.
उद्या, शुक्रवारी (दि. 27) संध्याकाळी सहा वाजता मंजू वाघमारे आणि सहकारी यांचा ‘बहारदार लावणी’ हा कार्यक्रम होणार आहे.