

कोल्हापूर : आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील महत्त्वाची चार पदे गेल्या अनेक दिवसापांसून रिक्त आहेत. जिल्ह्याला आरोग्य मंत्रिपद मिळाल्यानंतर ही पदे लवकर भरली जातील, अशी अपेक्षा होती. परंतु सहा महिने झाले तरी त्याकडे अद्याप दुर्लक्ष झाले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची सेवा पुरविण्याची जबाबदारी जिल्हा परिषद आरोग्य विभागावर आहे. दुर्गम, डोंगराळ भागातील नागरिकांना या विभागाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्यासाठी विविध उपायोजना राबिवण्यात येतात. त्यासाठी जिल्हा परिषदेत माता व बाल संगोपन अधिकारी हे स्वतंत्र पद तयार करण्यात आले आहे. परंतु जवळपास गेल्या दहा वर्षांपासून प्रभारीवर काम सुरू आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी अधिकारीपदाचीही अशीच अवस्था आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक कर्मचार्यांची संख्या ही आरोग्य विभाग आणि प्राथमिक शिक्षण विभागाकडे आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची आस्थापना खूप मोठी आहे. त्यामुळे सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणे जिल्हा आरोग्याधिकार्यांना शक्य नाही. त्यामुळे काही कामाची जबाबदारी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकार्यांवर असते. या पदावरदेखील गेल्या काही वर्षांपासून पूर्णवेळ अधिकारी नव्हते. मध्यंतरी डॉ. संजय रणवीर दीड ते दोन वर्ष पूर्णवेळ होते. त्यापूर्वी देखील हे पद बरेच दिवस अधून मधून रिक्त असायचे.
आरोग्य विभागामध्ये तांत्रिक आाणि प्रशासकीय असे दोन विभाग आहेत. तांत्रिकमध्ये वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक आदी पदे तांत्रिकमध्ये येतात. प्रशासकीयमध्ये क्लार्क, शिपाई, अधीक्षक, कक्ष अधिकारी यांचा समावेश आहे. प्रशासकीय कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागात प्रशासनाधिकारी पद आहे. परंतु गेल्या चार ते साडेचार वर्षांपासून हे पद देखील रिक्त आहे. सहायक जिल्हा आरोग्याधिकारीपद कागदावरच आहे. गेल्या वीस वर्षांपासून हे पद रिक्त आहे. या सर्वांचा आरोग्याच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.