kolhapur | कोल्हापूरच्या ‘ब्ल्यू लाईन’बाबत तत्काळ मार्ग काढू; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांना ग्वाही

निवासस्थानी विविध विषयांवर चर्चा
कोल्हापूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी उपस्थित आमदार अमल महाडिक, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर उपस्थित होते.
कोल्हापूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी उपस्थित आमदार अमल महाडिक, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर उपस्थित होते. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या ‘ब्ल्यू लाईन’बाबत तत्काळ मार्ग काढू, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना दिली. डॉ. जाधव यांनी ब्ल्यू लाईनमुळे शहराचा विकास खुंटल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देत, याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर बावनकुळे यांनी हे लोकांचे सरकार आहे, या प्रश्नांबाबत निर्णय घेण्याचीही आमची जबाबदारी असल्याचे सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री बावनकुळे यांनी रविवारी सकाळी डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. डॉ. जाधव यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. डॉ. जाधव म्हणाले, कोल्हापूर शहरात २०१९ आणि २०२१ साली पूर आले. हे दोन्ही पूर मानवनिर्मित होते. या पुराच्या संदर्भाने जलसंपदा विभागाने कोल्हापूर शहराची ब्ल्यू लाईन (पूर रेषा) निश्चित केली आहे. त्याचा शहरवासीयांना फटका बसत आहे.

शहराच्या लगत नदी वाहते. यामुळे नदीकडील बाजूला शहराची हद्दवाढ होत नाही, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, महापालिका झाल्यापासून कोल्हापूर शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्यातच ब्ल्यू लाईनच्या निर्बंधामुळे अनेक ठिकाणी बांधकामेच होत नाहीत. जवळपास निम्म्या शहराचा विकास खुंटला आहे. यामुळे याबाबत आपण तातडीने निर्णय घ्यावा आणि रखडलेल्या शहराच्या विकासाला चालना द्यावी व याबाबत तातडीने बैठक घ्यावी, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. यावेळी बैठकीबाबत पत्र दिल्याचे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले.

मंत्री बावनकुळे म्हणाले, तत्कालीन भौगोलिक कारण अथवा अतिवृ्ष्टीने एखाद्या वर्षी पूर येतो. कोल्हापूरला आलेले पूर तर मानवनिर्मितीच होते. पूर आला म्हणून त्याचाच संदर्भ घेऊन पूररेषा निश्चित करून विकासाला अडचण येत असेल तर त्यावर तत्काळ निर्णय घेतला जाईल. पूर रेषा निश्चित करण्यापूर्वी त्याबाबत अनेक उपाययोजना राबविता येणे शक्य आहे. नदीचे पात्र रुंद करण्यापासून विविध उपाय करता येतात. यामुळे एकदा पूर आल्यानंतर त्यावर लगेचच ब्ल्यू लाईन निश्चित करणे योग्य नाही. तसा निकष नाही. आम्ही नागपूरमध्ये ब्ल्यू लाईन काढून टाकल्या आहेत. यामुळे कोल्हापूर शहरासाठी याबाबत तातडीने मार्ग काढला जाईल. यावेळी डॉ. जाधव यांच्या हस्ते बावनकुळे यांचा शाल आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी 'महसूलपर्व' ही महसूल विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती असणारी पुस्तिका डॉ. जाधव यांना भेट दिली. यावेळी आमदार अमल महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन नाईक-निंबाळकर उपस्थित होते.

पाच वर्षांत पूर नाही : डॉ. जाधव

कोल्हापूर शहरात २०१९ व २०२१ साली आलेला पूर हा मानवनिर्मित होता. जिल्हाधिकारी कार्यालयातही पाणी शिरले होते. न्यू पॅलेससमोरही पाणी आले होते. अलमट्टी धरणातील पाणी सोडले जात नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर समन्वय साधला जात आहे. पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे गेल्या पाच वर्षांत पूर आलेला नाही. यामुळे ब्ल्यू लाईन तातडीने बदलली पाहिजे, हेही डॉ. जाधव यांनी मंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले.

जलसंपदा सचिवांशी फोनद्वारे चर्चा

मंत्री बावनकुळे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना फोन लावला. आपण डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी आहोत, त्यांनी ब्ल्यू लाईनचा प्रश्न सांगितला. त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

‘सीआरझेड’मध्येही शिथिलता दिली

नागरी विकासासाठी सीआरझेडमध्येही केंद्र शासनाने शिथिलता दिली आहे. राज्यातील काही भागात आपण ‘सीआरझेड’ही उठवले. नागपूरमध्ये ३५ ठिकाणी ब्ल्यू लाईन काढून टाकली. यामुळे कोल्हापूरसारख्या ठिकाणी नदी शहरालगतच असल्याने याबाबत प्राधान्याने निर्णय घ्यावाच लागेल, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news