Illegal Stone Crushers | जयसिंगपूरमध्ये भरवस्तीत बेकायदेशीर स्टोन क्रशर्सचा नंगानाच!

तहसीलदारांच्या मूक संमतीने चालताहेत डझनावारी बेकायदेशीर स्टोन क्रशर्स; मूक संमती ‘अर्थ’पूर्ण असल्याची चर्चा
Illegal Stone Crushers |
जयसिंगपूर : संभाजीपूर उपनगरात मोठ्या प्रमाणात स्‍टोन क्रशर सुरू असून यामुळे अनेक खणी तयार झाल्‍या आहेत.
Published on
Updated on

कोल्हापूर : जयसिंगपूर शहराच्या संभाजीपूर उपनगरात दोन डझनांहून अधिक स्टोन क्रशर चालकांनी अक्षरश: नंगानाच मांडला आहे. इथल्या तहसीलदारांच्या ‘अर्थ’पूर्ण मूक संमतीने हा प्रकार सुरू असल्याची या भागातील नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

संभाजीपूर हे जयसिंगपूरचेच उपनगर समजले जाते. २० वर्षांपूर्वी चौंडेश्वरी सूतगिरणी ते शिरोळ बायपास रोडच्या उत्तर बाजूस संभाजीपूरच्या माळरानावर एक-दोन दगड खाणी व स्टोन क्रशर्सना परवानगी दिली होती. जयसिंगपूर शहराच्या लगत असल्याने अल्पावधीत संभाजीपूरची नागरी वस्ती विस्तारत गेली आणि पूर्वी खाणी व स्टोन क्रशर्सना परवानगी दिलेला भागही नागरी वस्तीने वेढला गेला. सध्या या खाणींचा भाग नागरीवस्तीत समाविष्ट केला गेेला आहे.

नागरी वस्तीचा वेढा असूनही इथले स्टोन क्रशर्स वर्षानुवर्षे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. त्याहून विशेष म्हणजे, पूर्वी एक-दोन असलेल्‍या स्टोन क्रशर्सची संख्या आता दोन डझनांवर पोहोचली आहे. पाणी भरल्याने खाणी बंद पडल्या आहेत; पण क्रशर चालकांनी संभाजीपूर व धरणगुत्ती या दोन गावांच्या सीमेवरील खाणीतून दगड आणून क्रशर चालू ठेवले आहेत. दगड आणले जाणार्‍या खाणींचे उत्खननही बेकायदेशीरच आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात या खाणीत चालणाऱ्या धंद्यांसह 'अर्थ'पूर्ण कारभाराच्‍या चौकशीची गरज आहे. रात्री या खाणींत भूसुरूंगाचे स्फोट करून रातोरात ते दगड या स्टोन क्रशर्सवर लांबविले जातात. भूसुरूंग स्फोटांमुळे या परिसरातील घरांचे मोठे नुकसान होत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत.

या भागात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता दिवसभर हे क्रशर्स चालू आढळले. याबाबत विचारणा केली असता शिरोळचे तहसीलदार अनिल हेळकर यांनी क्रशर्सचा वीजपुरवठा आपण बंद केल्याचे सांगितले; पण केवळ एकच दिवसांपूर्वी इथले क्रशर्स चालू असलेले प्रस्तूत प्रतिनिधीसह अनेकांनी बघितले आहेत. याचा अर्थ तहसीलदार क्रशर चालकांना पाठीशी घालत आहेत, असा होतो. त्यामुळे या बाबतीत सर्वात आधी संबंधित तहसीलदारांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

(पूर्वार्ध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news