

इचलकरंजी : कबनुरातील गोळीबार प्रकरण आणि पिस्टल बनवण्याचा कारखाना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. या प्रकरणात आणखी आठ जणांची नावे बुधवारी निष्पन्न झाली आहेत. हे मोठे रॅकेट बेकायदेशीर पिस्टल बनवण्यासह त्याच्या विक्रीचे या प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचाही पोलिसांचा संशय आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी बिलाल सलीम मुल्ला (रा. कोळकी, वनदेव शेरी, फलटण), आफताब ऊर्फ मोहसिन जमाल मोमीन, जुनेद जमीर शेख (सर्व रा. कबनूर) युवराज बाळासाहेब पाटील (रा. कवलापूर, ता. मिरज), प्रणिल अशोक भाईमाने (रा. इचलकरंजी) या पाच जणांना मंगळवारी शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली, तर राकेश खोत (पूर्ण नाव समजू शकले नाही) हा पसार आहे. दरम्यान, मुख्य संशयित तुषार येरुडकर हा पोलिस कोठडीत आहे, तर शुभम दीपक सूर्यवंशी, जॉकी राजू माळगे हे दोघे दुसर्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सपोनि विजय मस्कर यांनी दिली. कबनुरात आठवडाभरापूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. त्यात नीलेश कांबळे जखमी झाला होता. त्यातून पिस्टल तस्करी व पिस्टल बनवण्याचा कारखाना उघडकीस आला होता. या प्रकरणात दोन पिस्टल तसेच मुख्य संशयित येरुडकर याच्याकडून पिस्टल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी येरुडकर याच्याकडे चौकशीत त्याच्या साथीदारांची नावे निष्पन्न झाली. येरुडकर याला पिस्टल पुरवणारा आणखी एक संशयित मनीष हाबळे (रा. सांगली) हा अद्याप पसार आहे. त्याचाही शोध सुरू आहे.
सांगलीसह फलटण कनेक्शन उजेडात
व्हीएमसी मशिनवर पिस्टल तयार करण्यासाठी येरुडकर अन्य साथीदारांसोबत फलटण येथे गेला होता. तिथे त्यांनी बिलाल मुल्ला याच्याकडून पिस्टल खरेदी केले. खरेदी केलेल्या पिस्टलची पाहणी करून तशीच तयार करण्याचा प्रयत्न त्याने केला. आणखी पिस्टल पुरवणारा तस्कर मनीष हाबळे हा सांगली जिल्ह्यातील असून, त्यापाठोपाठ या प्रकरणात कवलापूर येथील जुनेद शेख यानेही येरुडकर याला मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे.