

कोल्हापूर ः राधानगरी तालुक्यात अनेक गावांत मटक्याची अद़ृश्य समांतर अर्थव्यवस्था फोफावली आहे. मटक्याच्या चक्रव्यूहात तरुण पिढी अडकू लागली असून, बुकी मालामाल व खेळणारे अनेक जण कंगाल झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात ‘ओपन’ जेऊ देईना आणि ‘क्लोज’ झोपू देईना, अशी अवस्था झाली आहे. अनेक कुटुंबांना कर्जाच्या खाईत ढकलणार्या मटक्याचा अवैधधंदा रोखण्याची मागणी तालुक्यातून होत असून, पोलिस खाते या बुकींवर कारवाईचा बडगा कधी उगारणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
राधानगरी तालुक्यात गेल्या काही वर्षांत मटक्याने अक्षरशः गावोगावी हात- पाय पसरले आहेत. इचलकरंजी व मुरगूड येथून मटक्याची सूत्रे हलत असून, राशी एवढे गाव व राधेच्या नगरीत मुख्य केंद्रबिंदू आहे. तेथून सरवडे, कासार पुतळे, शेळेवाडी, चंद्रे, पनोरी, कपिलेश्वर, नरतवडे, तुरंबे, तिटवे, म्हासुर्ली, भोगावती येथे राजरोस मटका खेळला जात आहे. तालुक्यातील प्रमुख गावांत अनेक लोक मटक्याच्या विळख्यात अडकले आहेत.राशी एवढ्या गावात मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यालगत तर धामोडमध्येही मटका खेळला जात आहे. शेळेवाडी येथून पूर्व भागातील सूत्रे हलवली जातात. तर सरवडे येथील मटक्याचा विजय आसपासच्या परिसरात पसरला आहे. तालुक्याबाहेरील दोन अण्णांनी आपले साम—ाज्यच उभे केले असून, त्यांची विविध क्षेत्रांतील अनेकांवर कृपा असल्याची चर्चा आहे. एखादी खोली भाड्याने घेऊन पडदा बांधून ओपन-क्लोजची गणिते सोडवली जात आहेत. मटक्याच्या विरोधात ब— काढायचे धाडस कोणी दाखवत नाही. थेट पुरावा सापडत नसल्याने अनेकदा विरोध करणार्याला कायदेशीर बाबीत अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. प्रसंगी एखादी नोटीसही पाठवली जाते. कोणी थेट तक्रार करायला पुढे येत नाही आणि कारवाई झाली, तर ती जुजबी असते. त्यामुळे मटकासम—ाट निगरगट्ट झाले आहेत.
अनेक ठिकाणी रसद पोहोचत असल्याने ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ पद्धतीने ही यंत्रणा चालत आहे. तालुक्यातून मटक्याला तीव्र विरोध होत असूनही विरोधाचा आवाज क्षीण करण्यासाठी एक साखळी कार्यरत आहे. त्यामुळे मटक्याला राजमान्यता मिळाल्यासारखी परिस्थिती आहे. परिणामी, मटक्याचे मोहजाल किती कुटुंबांना कर्जबाजारी करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
मटका खेळणार्याला व्याजाने पैसे पुरवणारी एक यंत्रणा उभी राहिली आहे. मजुरी अथवा छोट्या नोकर्या करणार्यांना मटका लावण्यासाठी व्याजाने पैसा पुरवला जातो. आकडा लागला की बुकीकडे जाऊन अथवा साप्ताहिक पगाराच्या दिवशी पठाणी व्याजाने वसुली करायची, असा जोडधंदा दुधगंगा काठावरील मोठ्या गावांसह परिसरात सुरू आहे.